दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या मॅझन्सी सुपर लीग ट्वेंटी-20त बुधवारी भन्नाट सेलिब्रेशन पाहायला मिळालं. पार्ल रॉक्स आणि डर्बन हिट्स यांच्यातील सामन्यात गोलंदाजानं विकेट घेतल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन पाहून सर्वच चकित झाले. या लीगमध्ये एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन, अॅलेक्स हेल्स आणि फॅफ ड्यू प्लेसिस आदी ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू धुमाकूळ घालत आहेत. पण, या सर्वांपेक्षा आता आफ्रिकेचा एक गोलंदाज चर्चेत आला आहे. विकेट घेतल्यानंतर शूज काढून कोणाला तरी कॉल करण्याची त्याची अॅक्टींग प्रचलित होतीच. मात्र, बुधवारी त्यानं असं काही केलं की यापूर्वी क्रिकेट इतिहासात असं घडलंच नसावं.
पार्ल रॉक्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 195 धावा चोपल्या. कॅमेरून डेलपोर्टनं 49 चेंडूंत 10 चौकार व 3 षटकार खेचून 84 धावांची खेळी केली. त्याला कर्णधार फॅफनं 36 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 66 धावांची खेळी करून तोडीसतोड साथ दिली. पण, त्यांची ही खेळी व्यर्थ ठरली. हीट्सच्या अॅलेक्स हेल्सनं 55 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांच्या मदतीनं नाबाद 97 धावा कुटून संघाला 6 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. डेव्हीड मिलरनं 22 चेंडूंत 40 धावांची उपयुक्त खेळी केली. रॉक्स संघाच्या तब्रेझ शॅम्सीनं 37 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
पार्ल रॉक्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा तब्रेझ शॅम्सी हा चक्क सेलिब्रेशन करताना जादूगार झाल्याचं पाहायला मिळाला. दुसऱ्या डावाच्या आठव्या षटकात हा प्रकार पाहायला मिळाला. शॅम्सीच्या गोलंदाजीवर हिट्सच्या विहाब लूब्बेनं चेंडू टोलावलं. तो हार्डस विलजोइननं टीपला आणि लूब्बेला तंबूत जावं लागलं. त्यानंतर शॅम्सी नेहमीप्रमाणे शूज काढून कोणालातरी कॉल करण्याची अॅक्टींग करेल, असे सर्वांना अपेक्षित होतं. पण, घडलं भलतंच. शॅम्सीनं आपल्या टी शर्टमधून एक रुमाल काढला आणि त्यानंतर त्या रुमालातून अचानक एक सिलव्हर रंगाची दांडी निघाली. शॅम्सीचा हा जादूगार अवतार पाहून सर्वच चकीत झाले.
पाहा व्हिडीओ...