पाकिस्तान क्रिकेट पुनरुज्जीवनाच्या वाटेवर आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानात प्रथमच एखादा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळण्यास आला. पाकिस्तानी चाहत्यांनीही त्यांचे तितक्याच जोरात स्वागत केले. पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही स्थानिक क्रिकेट फॉरमॅटमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याच्या दृष्टीनं पावले उचलली आहेत. कारण, पीसीबीच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक क्रिकेटपटूंना मोठा फटका बसत आलेला आहे. त्यांच्यावरही बरीच टीका झाली.
पण, पीसीबीच्या या भोंगळ कारभारामुळे एका क्रिकेटपटूला उदरनिर्वाहासाठी ड्रायव्हिंग करण्याची वेळ आली आहे. हा क्रिकेटपटू कराचीत मिनी ट्रक चालवताना दिसला. 31 वर्षीय फझल सुभान हा पाकिस्तानातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी नाव आहे. त्यानं पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्वही केले. पाकिस्तानच्या एका पत्रकारानं हा फझलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केला.
''पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. विभागीय क्रिकेट खेळताना मला एक लाख पगार मिळायचा, परंतु आता 30 ते 35 हजार रुपये दिले जातात. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ही रक्कम पुरेशी नाही,''असे फझलने सांगितले. तो पुढे म्हणाला,''किमाल माझ्या हाताला काम आहे, याचे समाधान आहे. आता जी परिस्थिती आहे, ती पाहता भविष्यात हेही काम राहिल याची खात्री नाही. आमच्याकडे पर्याय नाही. मुलाबाळांसाठी काही तरी करावं लागेल. पिकअपचे कामही कधी असले तर अधिक असते, तर कधी काहीच काम नसतं.''पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी फझलबद्दल सहानभुती व्यक्त केली.