Ashwin Grand Welcome in India after Retirement: बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळला गेला. सततच्या पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला. परिणामी सामना अनिर्णित राहिला. सामना संपताच, भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने अचानक निवृत्ती जाहीर करून चाहते, क्रिकेट तज्ज्ञ आणि सहकारी खेळाडूंना आश्चर्यचकित केले. पत्रकार परिषदेत त्याने अधिकृत घोषणा केली, आणि त्यानंतर तो ताबडतोब भारताला रवाना झाला. निवृत्तीनंतर चेन्नई विमानतळावर उतरताच पत्नी ( Ashwin Wife Prithi narayan ) आणि दोन मुली यांनी त्याचे स्वागत केले.
विमानतळावर पत्नी, मुलींनी केलं अश्विनचं स्वागत
ब्रिस्बेनमधील सामना संपल्यानंतर अश्विन भारतात परतला. प्रदीर्घ प्रवासानंतर तो गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी चेन्नई विमानतळावर उतरला. त्याने विमानतळाच्या आत पाऊल ठेवले आणि प्रसारमाध्यमांनी त्याला घेरले. पण अतिशय नम्रपणे त्यांना बाजूला सारत अश्विनने आपल्या कारपर्यंंतचा रस्ता गाठला. त्याच्या दोन मुली आणि पत्नी कारमध्ये बसून त्याच्या येण्याची वाट पाहत होते. बाहेर पडताना माध्यमांची प्रचंड गर्दी होती, यानंतर अश्विन त्याच्या काळ्या रंगाच्या व्होल्वो कारमध्ये बसून घराकडे निघाला.
शेजाऱ्यांनी बँडबाजा बोलावून केलं जंगी स्वागत, वडिलांनी मारली मिठी
अश्विनच्या स्वागतासाठी त्याच्या घरी विशेष तयारी करण्यात आली होती. सोसायटीतील लोक आधीच हार, बँडबाजा घेऊन त्यांची वाट पाहत होते. अश्विन गाडीतून बाहेर येताच त्याचे वडील घराबाहेर आले आणि त्याला पाहताच मिठी मारली. त्याची आई खूपच भावूक झाल्याचे दिसले. सोसायटीतील लोकांनी त्याला मोठा फुलांचा हार घातला. तसेच काहींनी त्याची स्वाक्षरीही घेतली.
दरम्यान, भारतीय संघासाठी अश्विनने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक कसोटी विकेट्स घेतल्या. तसेच, कसोटी क्रिकेटच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी असताना अश्विनने क्रिकेटला रामराम ठोकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अश्विन क्लब क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. आगामी IPL 2025 मध्ये अश्विनने धोनीसोबत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.
Web Title: Video R Ashwin returns to India after retirement welcomed by wife and society members with grand ceremony
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.