नवी दिल्ली : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पंतने एका विश्वविक्रमाशी बरोबरी केली. त्याचबरोबर सर्वोत्तम भारतीय यष्टीरक्षक होण्याचा मानही पटकावला. या यशाचे श्रेय पंतने माजी कर्णधार आणि चाणाक्ष यष्टीरक्षक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला दिले आहे.
पंतने पहिल्या डावात सहा झेल पकडले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 5 झेल टीपले. त्यामुळे एका सामन्यात 11 झेल पकडणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वामध्ये अकरा झेल पकडणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी क्रिकेट विश्वामध्ये इंग्लंडचा जॅक रसेल आणि दक्षिण आफ्रिकेचा ए बी डी' व्हिलियर्स यांनी हा पराक्रम केला आहे. पण आतापर्यंत एकाही यष्टीरक्षकाला 12 झेल टीपता आलेले नाहीत. त्यामुळे पंतने या सामन्यात 11 झेल पकडत विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात पंतने मिचेल स्टार्कचा झेल पकडला. हा त्याचा अकरावा झेल होता.
या सर्व यशाचे श्रेय पंतने धोनीला दिले आहे. पंत म्हणाला की, " धोनी हा देशाचा हिरो आहे. मी एक खेळाडू आणि व्यक्ती म्हणून धोनीकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. जेव्हा धोनी जवळपास असतो तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास मला जाणवतो. जेव्हा मला कुठलीही समस्या येते तेव्हा मी धोनीकडे जातो. धोनी ज्यापद्धतीने माझ्या समस्यांचे निवारण करतो की त्यानंतर कोणतेच प्रश्न मनात राहत नाहीत. त्यामुळे माझ्या आतापर्यंतच्या यशामध्ये धोनीचा महत्वाचा वाटा आहे."