टीम इंडियाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत द. आफ्रिकेचा धुव्वा उडवत अष्टविजय मिळवला. विराट कोहलीच्या दमदार शतकाने आणि श्रेयस अय्यरच्या तुफानी फलंदाजीमुळे भारताने ५० षटकांत ३०० धावांचा टप्पा पार केला. द. आफ्रिकेला टीम इंडियाने ३२७ धावांचे लक्ष्य दिल्याने पहिल्या षटकापासूनच आफ्रिकन फलंदाज दडपणाखाली दिसून आले. त्यातच, मोहम्मद शमी आणि सर रविंद्र जडेजाने केलेला भेदक मारा आफ्रिकेला चांगलाच मारक ठरला. त्यामुळे, आफ्रिकन संघ अवघ्या ८३ धावांतच तंबूत परतला. या दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाची DRS निर्णयावरुन झालेली जुगलबंदी व्हायरल झाली आहे.
विराट कोहलीच्या विक्रमी शतकानंतर भारतीय गोलंजादांनी पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चोप देणारे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात क्विंटन डी कॉकला ( ५) त्रिफळाचीत केले. रवींद्र जडेजाने ९व्या षटकात टेम्बा बवुमाचा ( ११) त्रिफळा उडवला आणि मोहम्मद शमीने भारताच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर केला.
भारतीय त्रिकुट गोलंदाजांपुढे आफ्रिकन फलंदाजांनी नांग्या टाकल्या. त्यात, रविंद्र जडेजाने ५ गडी बाद करत विश्वचषक स्पर्धेत नवा विक्रम रचला. या दरम्यान, १३ व्या षटकातील रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर DRS घेण्यावरुन कर्णधार रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळाली. यावेळी, कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला होता, त्याच्या तोंडून आपसूकच शिवी बाहेर आली.
हेनरिक क्लासेनने जडेजाचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटला चुकवून पॅडवर आदळला आणि एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आले. गोलंदाज जडेजाला फलंदाज बाद झाल्याचा पूर्ण विश्वास होता. तो रोहित शर्माकडून डीआरएससाठी आग्रह करू लागला. मात्र, यष्टीरक्षक के.एल राहुल फारसा आग्रही दिसला नाही. त्यावेळी, रोहित शर्माने रविंद्र जडेजाकडे हात करत त्याला मुंबईस्टाईल आपुलकीनं खडसावलं. जणू हाच एक फलंदाज आहे, असे म्हणत त्याने शिवी दिली. रोहितचं हे विधान स्टंम्पच्या माईकमध्ये कैद झाल्याने सर्वांना ऐकू आलं. आता, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. दरम्यान, जडेजाचे ते निरीक्षण खरे ठरले, कारण DRS मुळे क्लासेनला तंबूत परतावे लागले.