Join us

VIDEO: सचिन तेंडुलकरचा 'अप्पर कट' सिक्सर... मास्टर ब्लास्टरच्या खेळीने फॅन्स खुश

Sachin Tendulkar Upper Cut Six Video: सचिन तेंडुलकरने अप्पर कट खेळून मारलेला षटकार विशेष चर्चेचा विषय ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:49 IST

Open in App

Sachin Tendulkar Upper Cut Six Video: विविध देशांच्या निवृत्त दिग्गज क्रिकेटपटूंची लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या अंतिम फेरीत भारताने विंडिजचा पराभव केला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स संघाने ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज मास्टर्सला संघाला ६ गडी राखून पराभूत केले. विंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १७.१ षटकात १४९ धावा करत विजय मिळवला. या विजयासह आणखी एका गोष्टीने क्रिकेटप्रेमींना खुश केले, ते म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर. त्याने अप्पर कट खेळून मारलेला षटकार तर विशेष चर्चेचा विषय ठरला.

भारत मास्टर्सकडून सचिनने दमदार सुरूवात केली होती, पण त्याची खेळी फार लांब चालली नाही. त्याने १८ चेंडूत २५ धावा केल्या. सचिनने आपल्या खेळीत दोन चौकारांसह एक षटकार मारला. महत्त्वाची बाब म्हणजे, सचिनने मारलेल्या एकमेव षटकारालाही चाहत्यांची दाद मिळाली. जुना सचिन पुन्हा पाहायला मिळाला असं अनेकांनी म्हटलं. डावाच्या सहाव्या षटकात जेरम टेलर गोलंदाजी करत होता. त्याने सचिनला ऑफसाईड दोन चेंडू टाकले. त्यातील आधीच्या चेंडूवर सचिनने चौकार मारला. त्यानंतर पुढचा चेंडू ऑफसाईडला बाऊन्सर आला. त्यावर सचिनने अप्पर कट मारून जोरदार षटकार खेचला आणि साऱ्यांना जुना सचिन आठवला. त्या षटकाराचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झालाय.

पाहा सचिनचा 'अप्पर कट' षटकार-

दरम्यान, सचिनने दमदार फटकेबाजीने सुरुवात केल्यानंतर सातव्या षटकात तो बाद झाला. टीनो बेस्टच्या गोलंदाजीवर पूल शॉट खेळताना सचिन सीमारेषेवर झेलबाद झाला. पण अंबाती रायुडूने ७४ धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. त्याला सामनावीरही घोषित करण्यात आले.

टॅग्स :सचिन तेंडुलकरव्हायरल व्हिडिओभारत विरुद्ध वेस्ट इंडिज