भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) सध्या लीजंड्स लीग क्रिकेटमध्ये ( LLC) इंडियन महाराजा संघाचे प्रतिनिधित्व करतोय... दोहा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ३६ वर्षीय फलंदाजाने कमाल करून दाखवली आहे. १५ ऑगस्ट २०२०मध्ये सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आजची तो चांगल्या फॉर्मात दिसतोय. वर्ल्ड जायंट्स संघाविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना सुरेश रैनाने ४१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारासह त्याने ४९ धावांची खेळी केली. पण, ख्रिस गेलने ५७ धावांची खेळी करताना १८.४ षटकांत ७ विकेट्सच्या मोबदल्यात १३७ धावांचे लक्ष्य पार केले अन् महाराजा संघाचा पराभव झाला.
महाराजा संघाचा हा चार सामन्यांतील तिसरा पराभव ठरला आणि दोन गुणांसह ते तालिकेत तळाला आहेत. महाराजा संघाकडून गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा आणि रैना यांनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. गंभीरने सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावली आहेत, तर उथप्पाने तिसऱ्या सामन्यात ३९ चेंडूंत ८८ धावांची खेळी करून दाखवली.
चौथ्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुरेश रैनाला एक प्रश्न विचारला गेला. लीजंड्स लीग क्रिकेटमधील तुझ्या आजच्या कामगिरीनंतर सर्वांना तुला पुन्हा आयपीएल मध्ये खेळताना पाहण्याची इच्छा आहे, असे एका पत्रकाराने म्हटले. त्यावर सुरेश रैनाने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, मी सुरेश रैना आहे. मी शाहिद आफ्रिदी नाही. मी निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर सारेच हसू लागले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"