ICC ODI World Cup IND vs AFG : रोहित शर्माच्या विश्वविक्रमी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने ठेवलेले २७३ धावांचे लक्ष्य भारताने ८ विकेट्स व १५ षटकं हातची राखून पार केले. रोहित शर्माने ८४ चेंडूंत १६ चौकार व ५ उत्तुंग षटकारांच्या आतषबाजीसह १३१ धावा कुटल्या आणि त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले. भारतीय संघाचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्घ होणार आहे. अफगाणिस्ताविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाचा ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ BCCI ने पोस्ट केला आहे.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासह न्यूझीलंड व पाकिस्तान यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत. न्यूझीलंड १.९५८ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर होता आणि पाकिस्तान दुसऱ्या... पण, आता भारतीय संघ १.५०० अशा नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि पाकिस्तानला ( ०.९२७) तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.
रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ड्रेसिंग रूममध्ये एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीला ड्रेसिंग रूममध्ये पदक देण्यात आले होते. यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर विराटच्या हस्ते अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला पदक दिले गेले. शार्दूलला त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी हे पदक देण्यात आले आहे. कारण सामन्यादरम्यान त्याने बाऊंड्री लाईनवर खूप चांगला झेल घेतला.