Snake on Cricket Ground: मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू असताना अनेकदा कुत्रा, मांजर किंवा पक्षी आल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेकदा सामन्यात व्यत्यय येतो आणि काहीकाळ सामना थांबवावा लागतो. कुत्रा किंवा पक्षी मैदानावर येणे सामान्य गोष्ट आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत सुरू असलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये सापांनी कहर केला आहे. या टी-20 लीगदरम्यान मैदानावर अनेकदा साप आल्याने सामने थांबवावे लागले आहेत. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत श्रीलंकेत आशिया चषक होणार आहे.
सध्या श्रीलंकेत T20 लंका प्रीमियर लीग सुरू आहे. या लीगमध्ये पाकिस्तानसह अनेक देशांचे खेळाडू खेळत आहेत. पण, गेल्या काही सामन्यांमध्ये थेट मैदानावर साप आल्याने सामने काही काळ थांबवण्याची वेळ आली आहे. या घटनांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात बी लव्ह कँडी आणि जाफना किंग्स यांच्यातील सामन्याचा आहे. यावेळी श्रीलंकेचा खेळाडू थोडक्यात सापावासून वाचला.
सापावर पाय देणार तेवढ्यात...
12 ऑगस्टला कँडी आणि जाफना यांच्यातील सामना सापामुळे थांबवण्यात आला होता. या सामन्यात जाफनाचा खेळाडू इसुरु उडाना क्षेत्ररक्षण करत असताना मैदानात साप आला. उडाना उलट दिशेने चालत होता आणि त्याच्या पाठीमागे साप होता. साप उडानाच्या इतका जवळ आला होता की, त्याचा पाय सापावर पडणार होता. पण, सुदैवाने उडानाला साप दिसला आणि तो तात्काळ बाजुला झाला. यानंतर तो साप कॅमेरा मॅनजवळही पोहोचला, त्यामुळे सर्वांना आपापल्या जागेवरुन उठून पळावे लागले.
आशिया कप श्रीलंकेतयेत्या काही दिवसांत आशिया कप होणार असून, भारताचे पाकिस्तानविरोधातील सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. एकूण 13 सामन्यांपैकी 4 पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत, बाकीचे श्रीलंकेत होणार आहेत. भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. पाकिस्तानच्या लाख प्रयत्नांनंतरही भारत पाकिस्तानमध्ये न खेळण्याच्या निर्णयावर ठाम आहे. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान आशिया चषक होत आहे.