मुंबई : महाराष्ट्र संघाने सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग A गटात अव्वल स्थान पटकावताना अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत त्यांना कर्नाटकचा सामना करावा लागणार आहे. सुपर लीगच्या शेवटच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने रेल्वेवर 21 धावांनी विजय मिळवला, तर कर्नाटकने B गटात सहा विकेट राखून विदर्भवर मात केली. महाराष्ट्राच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडनं सीमारेषेवर टीपलेला झेप पाहून पंचही चक्रावले. ऋतुराजच्या या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रेल्वेनं नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. 4.1 षटकांत महाराष्ट्राच्या दोन फलंदाज 16 धावांवर माघारी परतले होते, परंतु निखिल नाईक आणि नौशाद शेख यांनी रेल्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. निखिलने 58 चेंडूंत नाबाद 95 धावा केल्या आणि त्याच्या या खेळीत 4 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. नौशादने 39 चेंडूंत 59 धावा ( 6 चौकार व 2 षटकार ) केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी करताना संघाला 5 बाद 177 धावांचा पल्ला गाठून दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना रेल्वेला 20 षटकांत 156 धावाच करता आल्या. रेल्वेकडून मृणाल देवधर ( 44 चेंडूंत 55 धावा) आणि प्रथम सिंग ( 18 चेंडूंत 29 धावा) यांनी संघर्ष केला. डावाच्या अखेरच्या चेंडूंवर मनजीत सिंगने साईटस्क्रीनच्या दिशेनं खणखणीत फटका मारला. हा चेंडू सीमारेषा सहज पार करेल असेच सर्वांना वाटले होते, परंतु ऋतुराजने अप्रतिम जिमनॅस्ट स्किल दाखवत तो चेंडू हवेतच टीपला आणि सीमारेषेच्या आत भिरकावला. जवळच उभ्या असलेल्या दिव्यांग हिमगणेकरने तो चेंडू टीपून रेल्वेचा डाव गुंडाळला. ऋतुराजची ही सुपरमॅच उडी पाहून पंचही चांगलेच चक्रावले होते.पाहा व्हिडीओ... दरम्यान, विदर्भने ठेवलेले 139 धावांचे लक्ष्य कर्नाटकने 4 चेंडू व सहा विकेट्स राखून सहज पार केले. मनीष पांडेच्या नाबाद 49 धावा ( 3 चौकार व 2 षटकार ) आणि रोहन कदमच्या 39 धावांच्या जोरावर कर्नाटकने हा विजय मिळवला.