मुंबई - येथे वानखेडे मैदानात रंगलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात करत मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत विजय संपादन केला. लंकेविरोधातील विजयानंतर भारतीय संघानं ख्रिसमस सेलिब्रेशन केलं. यामध्ये माजी कर्णधार एम.एस धोनी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. धोनी या सेलिब्रेशनमध्ये चक्क संता झाला होता. याचा व्हीडीओ बीसीसीआयनं पोस्ट केला आहे.
नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला भारतीय संघानं लंकेचा फडशा पाडला. भारतानं अखेरचा सामना पाच विकेटनं जिंकला. त्यानंतर पुरस्कार वितरनाच्या कार्यक्रमावेळी भारतीय खेळाडू संताक्लॉजच्या टोप्या घालून मैदानात अवतरले होते. विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी संघातील काही खेळाडू धोनीला संतासारखी दाढीवाली टोपी घातली होती. त्यानंतर संघातील खेळाडूनी धोनीसोबत सेल्फीही घेतल्या. यामध्ये सर्वच नवख्या खेळाडूंचा समावेश होता. दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्याद्वारे भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरच्या हातात विजयी ट्रॉफी देण्यात आली होती.
टीम इंडियानं पहिल्यांदाच मुंबईमध्ये टी२० सामना जिंकण्याची कामगिरीही केली. लंकेने दिलेल्या १३६ धावांचे आव्हान भारताने ४ चेंडू राखून पार पाडले. भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेली असल्याने वानखेडे स्टेडियमवरील हा सामना अपौचारीकतेचा ठरला होता. मात्र, याआधी वानखेडेवर झालेल्या दोन्ही टी२० सामन्यात भारताला इंग्लंड व वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. परंतु, मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने येथे पहिला विजय मिळवण्यात यश मिळवले. धावांचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली. लोकेश राहुल (४) स्वस्तात परतल्यानंतर रोहित - श्रेयस अय्यर या मुंबईकर जोडीने भारताला सावरले. परंतु, आक्रमक फटका मारण्याच्या नादात रोहित (२७) झेलबाद झाला. यानंतर अय्यर - मनिष पांडे यांनी ४२ धावांची भागीदारी करुन पडझड रोखली. परंतु, ठराविक अंतराने बळी घेत लंकेन भारतावर दडपण आणले. एकवेळ १६.१ षटकात भारताची ५ बाद १०८ धावा अशी अवस्था झाली होती. परंतु, दिनेश कार्तिक - महेंद्रसिंग धोनी या जोडीने भारताला विजयी केले. अय्यरने ३२ चेंडूत ३०, तर मनिषने २९ चेंडूत ३२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कार्तिकने १२ चेंडूत नाबाद १८ आणि धोनीने १० चेंडूत नाबाद १६ धावा करत भारताला विजयी केले. दुष्मंता चमीरा व दासुन शनाका यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.