भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र तो अजूनही आयपीएल खेळतो. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यादरम्यान, महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दिसत आहे.
या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि डोनाल्ड ट्रम्प हे गोल्फच्या मैदनावर दिसत आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी धोनीसाठी एका सामन्याचं आयोजन केलं होतं. धोनी आणि ट्रम्प एका व्हिडीओमध्ये एकत्र खेळताना दिसत आहेत. आयपीएल २०२३ नंतर धोनी निवृत्त होणार अशी चर्चा होती. मात्र त्यावेळी त्याने तसा निर्णय जाहीर केला नव्हता. धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न आहेत. मात्र निवृत्तीचा विषय काढला असता त्याने टी-२० लीगच्या नव्या हंगामाच्या लिलावाला अद्याप वेळ आहे. अशा परिस्थितीत याबाबतचा निर्णय त्याचवेळी घेतला जाईल, असं सांगितलं.
धोनी सध्या अमेरिकेमध्ये असून, तो अमेरिकन ओपन स्पर्धेवेळी उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहण्यासाठीही पोहोचला होता. हा सामना पुरुष एकेरीतील अव्वल खेळाडू कार्लोस अल्कराज आणि अलेक्झँडर ज्वेरेव यांच्यामध्ये खेळवला गेला होता.