भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आपल्या कामगिरीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं आहे. फलंदाजीतच नव्हे तर यष्टिमागील त्याचं योगदान हे अमुल्य आहे. त्याच्या यष्टिमागील त्याचे कौशल्य पाहून अनेक दिग्गजही थक्क झाले आहेत. त्यामुळेच त्याच्या शैलीची कॉपी झालेली अनेकदा पाहायला मिळाली. पण, यष्टिमागील धोनीची कॉपी करणं सर्वांनाच जमतं असं नाही. त्यामुळेच अनेकदा केवळ धोनीस्टाईल मारायची म्हणून अनेक यष्टिरक्षकांनी सोपी संधी गमावल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली चषक ट्वेंटी-20 स्पर्धेतही असाच प्रसंग घडला. फलंदाज क्रीज सोडून मधोमध असूनही यष्टिरक्षकाला त्याला बाद करता आले नाही.
मध्य प्रदेश आणि मेघालय यांच्यातील सामन्यात हा प्रकार घडला. मध्य प्रदेशनं प्रथम फलंदाजी करताना समाधानकारक धावसंख्या उभारली. कर्णधार नमन ओझानं 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 56 धावा कुटल्या. त्याला आशुतोष शर्माची तोडीसतोड साथ मिळाली. शर्मानं 27 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून 60 धावा केल्या. त्यानंतर रजत पाटीदार आणि पार्थ सहानी यांनी मध्य प्रदेशचा डाव सावरला. पण, या सामन्यात मेघालयाच्या यष्टिरक्षक पुनित बिश्त यांनी पाटीदारला बाद करण्याची सोपी संधी गमावली.
डावाच्या 17व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर संजय यादवच्या गोलंदाजीवर पाटीदारनं फटका मारला आणि धाव घेण्यासाठी त्यानं क्रीज सोडलं. तोपर्यंत मेघालयाच्या क्षेत्ररक्षकानं चेंडू बिश्तकडे फेकला. बिश्तच्या हातात चेंडू होता तेव्हा पाटीदार खेळपट्टीच्या मधोमध होता. पण, तरीही बिश्त त्याला बाद करू शकला नाही. तेव्हा मध्य प्रदेशच्या 3 बाद 189 धावा झाल्या होत्या आणि पाटीदार 38 धावांवर खेळत होता. का... ते तुम्ही पाहा...
पाहा व्हिडीओ...