मुंबई: क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे मोठ्या थाटामाटात लग्न करतील असे वाटत होते. पण, या दोघांनी कोणाताही गाजावाजा न करता 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने लग्न अगदी खासगी पद्धतीने कोर्ट मॅरेज केले. रजिस्टर पद्धतीने लग्न केलं असलं तरीही त्यांची पार्टी मात्र भारीच ग्रॅण्ड ठरली. कॉकटेल पार्टीपासून ते रिसेप्शनपर्यंत सारं काही अगदी थाटात पार पडलं.
सोमवारी मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील दिग्गज सहभागी झाले होते. कुलाब्यातील ताज हॉटेल येथे या अलिशान पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, आशिष नेहरा, युवराज सिंग, अजित आगरकर यांच्यासह अनेक क्रिकेटपटू होते. पण सर्वांच्या नजरा खिळल्या त्या विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या जोडीवर. युवराजच्या लग्नात ठेका धरल्यानंतर विराट-अनुष्का जोडीने झहीरच्या रिसेप्शनमध्येही धमाल केली. दिल धड़कने दो’ सिनेमातील ‘गल्ला गोरियां’ गाण्यावर या जोडीने ठेका धरला. त्यांच्याशिवाय इतर अनेक क्रिकेटपटूंनी या पार्टीत आपल्या डान्सचा जलवा दाखवला.
कुलाब्यातील ताज येथे या अलिशान पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, झहीरने निळ्या रंगाचा बंदगळा कुर्ता घातला होता तर सागरिकाने आयव्होरी आणि सब्यासाचीने डिझाइन केलेला सुंदर लेहंगा घातला होता. त्यावर तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी साजेसे सोन्याचे भरजरी दागिने घातले होते.