भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली चौथी व अखेरची कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानेस यांच्या उपस्थितीत हा सामना खेळवला जात असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मैदानावर स्वागत केले. तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मीथने पीएम अँथोनी अल्बानेस यांचे वेलकम केले. सामन्याच्या सुरुवातीला भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे, परंतु अहमदाबाद कसोटी भारतासाठी जिंकणे महत्त्वाचे आहे. जागतिक कसोटीतील अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यातच, आज दस्तुरखुद्द पंतप्रधान मैदानात उपस्थित राहून सामना पाहात असल्याने टीम इंडियावर दडपण असणार आहे, त्यासोबतच, प्रोत्साहनही मिळणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांना त्यांच्या त्यांच्या पंतप्रधानांनी कसोटी कॅप देऊन सन्मानित केले.
भारताची २-१ अशी आघाडी
भारताने नागपूर व दिल्ली कसोटी तीन दिवसांत जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती, परंतु स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटीत कमबॅक केले. भारतावर ९ विकेट्स राखून विजय मिळवून त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे, सध्या भारताला २-१ अशी आघाडी आहे. पॅट कमिन्सने कौटुंबिक कारणास्तवर मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला अन् स्टीव्ह स्मिथने कमाल करून दाखवली.