INDWvsBANW : भारतीय महिला संघाला शनिवारी बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या वन डे सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. बांगलादेशच्या ४ बाद २२५ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांत २२५ धावांत तंबूत परतला अन् मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पण, त्यानंतर खरं नाट्य सुरू झाले. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) ने अम्पायरच्या निर्णयावर लाईव्ह सामन्यात नाराजी व्यक्त करताना स्टम्पवर बॅट आदळली होती. ती इथेच थांबली नाही प्रेझेंटेशन सेरेमनीतही तिने अम्पायरवर टीका केली आणि नाराजी जाहीर केली. आता तरी हरमनप्रीत थांबेल असे वाटले होते, परंतु तिने ट्रॉफी घेताना बांगलादेशच्या संघाचाच अपमान केला.
बांगलादेशने ५० षटकांत ४ बाद २२५ धावा केल्या. बांगलादेशकडून फरझाना होक हिने १६० चेंडूत १०७ धावांची खेळी केली, तर शमीमा सुल्ताना (५२), कर्णधार निगर सुल्ताना (२४), आणि सोभना मोस्टरीला (२३) चांगल्या खेळल्या. भारताकडून स्मृती मानधना ( ५९) आणि हरलीन देओल ( ७७) यांनी अर्धशतकी खेळी केली. हरमनप्रीत कौर (१४) आणि जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद (३३) धावा करून भारताच्या विजयाच्या आशा जिंवत ठेवल्या. अखेरच्या २ षटकांमध्ये भारताला विजयासाठी ९ धावांची गरज होती तर बांगलादेशला १ विकेट हवी होती. सेट फलंदाज जेमिमा खेळपट्टीवर टिकून होती. पण मेघना सिंहला बाद करण्यासाठी बांगलादेशने रणनीती बनवली. मेघनाने ४९वे षटक चांगले खेळले. ५०व्या षटकात मेघनाच्या बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला अन् बांगलादेशने भारताच्या तोंडचा घास पळवला.
ट्रॉफीसोबत फोटो काढताना हरमनप्रीतने बांगलादेशच्या कर्णधाराला अम्पायरलाही बोलवण्या सांगितले. ती म्हणाली तुमच्यामुळे थोडी सामना टाय झालाय, त्या अम्पायरमुळे झालाय. बोलवा त्याला. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराने सर्व खेळाडूंना फोटो सेशनवर बहिष्कार टाकण्यास सांगितला अन् सर्व ड्रेसिंग रुममध्ये गेले. हरमनप्रीत भारतीय संघाची जरी कर्णधार असली तरी तिचे हे वागणे चाहत्यांनाही आवडलेले नाही.