टीम इंडियाच्या युवा शिलेदारांनी ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर अश्विन हे अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे एकामागून एक संघाबाहेर झाले. त्यानंतरही अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. रिषभ पंत, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल, शार्दूल ठाकूर, टी नटराजन हे भविष्याचे स्टार टीम इंडियाला या मालिकेतून मिळाले. पण, या संपूर्ण मालिकेत अनुभवी गोलंदाज कुदीप यादव ( Kuldeep Yadav) याला डग आऊटमध्येच बसून रहावे लागले. मागील एक वर्ष कुलदीप मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील यशानंतर ड्रेसिंग रुममध्ये जेव्हा साऱ्यांचे कौतुक होत होते, तेव्हा कर्णधार अजिंक्यनं कुलदीपलाही मोलाचा सल्ला दिला. त्याच्या या कृतीचे साऱ्यांकडून कौतुक होत आहे.
अजिंक्यनं २६ वर्षीय कुलदीपला खचू नकोस असा सल्ला देताना सर्व सहकाऱ्यांसमोर कौतुक करून त्याचे मनोबल उंचावले. अजिंक्य म्हणाला,''हा ऐतिहासिक यशात सर्वांचे महत्त्वाचे योगदान आहे. कुणा एका व्यक्तिमुळे नव्हे, तर सर्वांमुळे आपण जिंकलो. यावेळी मी विशेष करून कुलदीप आणि कार्तिक त्यागी यांचे नाव घेईन. कुलदीप हा दौरा तुझ्यासाठी खडतर होता. तू एकही सामना खेळला नाहीस, परंतु संघाबाहेर राहून तू दिलेलं योगदान काही कमी नाही. आता आपण भारतात जात आहोत आणि तुझाही टाईम येईल. फक्त मेहनत करणं सोडू नकोस.''
पाहा व्हिडीओ...
जिंकलंस अजिंक्य!; कांगारूचा लोगो असलेला केक कापण्यास दिला नकारऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत अजिंक्यनं त्याचे नेतृत्व कौशल्य जगाला दाखवून दिले. मेलबर्नवरील अविस्मरणीय शतक. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढत चाललेली यादी पाहूनही तो डगमगला नाही, उलट नव्या दमाच्या सहकाऱ्यांना घेऊन कागांरूंशी भिडला. ढोल ताशा, तुतारी, फुलांची उधळण, रेड कार्पेट असं दणक्यात अजिंक्यचे स्वागत करण्यात आले. यावेळीसाठी एक खास केक तयार करण्यात आला होता. त्यावर कांगारूचा लोगो होता आणि अजिंक्यचा फोटोही होता. पण अजिंक्यनं तो केक कापण्यास नकार दिला. त्याच्या याही कृतीचं सर्वांनी कौतुक केलं.