अयाझ मेमन
विंडीज दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील मालिका जिंकत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व राखले. विशेष म्हणजे यामध्ये भारताने एकही सामना गमावला नाही. शिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्यानंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील यश भारतासाठी सर्वात महत्त्वाचे ठरले. दोन्ही कसोटी सामने मोठ्या फरकाने जिंकत भारताने १२० गुणांच्या कमाईसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. कसोटी मालिकेतील कामगिरीनुसार भारतीय खेळाडूंचे मांडलेले रिपोर्ट कार्ड...
लोकेश राहुल (4.5/10)
एक अर्धशतक झळकावूनही राहुल मिळालेली संधी साधण्यात अपयशी ठरला. गेल्या वर्षी आॅस्टेÑलिया दौºयातील निराशाजनक कामगिरीनंतर त्याला सातत्याने रोहित शर्माच्या कडव्या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
मयांक अग्रवाल (5.5/10)
दुसºया कसोटी सामन्यात शानदार अर्धशतक झळकावत मयांकने आपली क्षमता दाखवली. परंतु, मोठी खेळी करण्यात आलेल्या अपयशामुळे संघातील त्याचे स्थानही निश्चित नसेल.
चेतेश्वर पुजारा (4.5/10)
पुजाराचा उच्च दर्जा लक्षात
घेता त्याच्यासाठी ही मालिका अत्यंत निराशाजनक ठरली. तो फॉर्ममध्ये नव्हता असे दिसले
नाही, पण चांगली सुरुवात
करण्यात आलेल्या अपयशामुळे पुजाराकडून निराशा झाली. पुढच्या मालिकेत नक्कीच तो खोºयाने धावा काढेल.
विराट कोहली (7.5/10)
मालिकेत सर्वाधिक धावा फटकावणाºया अव्वल दोन फलंदाजांमध्ये कोहलीने स्थान मिळवले नाही आणि हे अत्यंत दुर्मीळ आहे. शिवाय त्याला पहिल्याच चेंडूवर बाद होतानाही पाहिले. तरीही त्याने दोन शानदार अर्धशतकी खेळी करत आपला स्तर दाखवला. याशिवाय कर्णधार म्हणून त्याने नेहमीप्रमाणे वर्चस्व गाजवले.
अजिंक्य रहाणे (9/10)
गेल्या १५-१८ महिन्यांतील निराशाजनक कामगिरीनंतर दबावाखाली खेळलेल्या रहाणेने दोन्ही सामन्यांत दमदार फलंदाजी केली. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाने मजबूत स्थिती मिळवताना पूर्ण मालिकेत वर्चस्व गाजवले.
हनुमा विहारी (9.5/10)
या मालिकेत विहारी टॉप परफॉर्मर ठरला. अंतिम संघातील त्याच्या समावेशानंतर थोडा वादही झाला. पण त्याने आपल्या खेळीतून स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. दमदार फलंदाजी करतानाच मधल्या फळीतही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
रिषभ पंत (4.5/10)
यष्ट्यांमागे रिषभ यशस्वी ठरला, पण फलंदाज म्हणून क्वचितच लक्ष वेधले. मोठ्या खेळी करण्याच्या संधी त्याने गमावल्या. इतर युवा खेळाडूही भारतीय संघाचे दार ठोठावत असल्याने या निराशाजनक कामगिरीचा रिषभला फटका बसू शकतो.
रवींद्र जडेजा (7.5/10)
रविचंद्रन अश्विनला मागे टाकून अंतिम संघात स्थान मिळवलेल्या जडेजाने संघाला गरज असताना धावा काढल्या आणि बळी मिळवले. याशिवाय क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीप्रमाणे लक्ष वेधले.
ईशांत शर्मा (9/10)
संघातील वरिष्ठ गोलंदाज म्हणून ईशांत शर्माने छाप पाडली. नवीन आणि जुन्या चेंडूने भेदक मारा करत त्याने दबदबा राखला. त्याचबरोबर फलंदाजीत महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावून त्याने सर्वांना चकितही केले.
जसप्रीत बुमराह (9.5/10)
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यापासून जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी झेप घेत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलौकिक क्षमतेने तो कायम प्रतिस्पर्धी फलंदाजांना गोंधळात पाडतो. दोन अत्यंत भेदक स्पेल टाकत त्याने हॅट्ट्रिकही नोंदवली. बुमराह क्रिकेटमधील सध्याचा सर्वात आव्हानात्मक आणि भेदक गोलंदाज आहे.
मोहम्मद शमी (8.5/10)
जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा या वेगवान जोडीसह मोहम्मद शमी यानेही आपली छाप पाडली. कमालीच्या वेगासह नियंत्रण आणि सातत्य हे त्याच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य आहे. खेळपट्टीकडून
थोडी जरी मदत मिळाली, तर तो
चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेमुळे अत्यंत धोकादायक गोलंदाज
ठरतो.
( लेखक लोकमत वृत्त समुहात कन्सल्टिंग एडिटर आहेत )
Web Title: Vihari and Bumrah have drawn attention
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.