मुंबई : सलामीवीर अथर्व तायडेच्या नाबाद १६४ धावांच्या झंझावातामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विदर्भ संघाने विजय हजारे चषक एकदिवसीय स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना आंध्र प्रदेशचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला. अथर्वने १२३ चेंडूंत १५ चौकार व ५ षट्कारांचा पाऊस पाडत विदर्भाला सहज विजयी केले. आंध्र प्रदेशला ५० षटकांमध्ये ८ बाद २८७ धावांत रोखल्यानंतर विदर्भ संघाने अथर्वच्या जोरावर ४१.४ षटकांतच बाजी मारत २ बाद २८८ धावा केल्या.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून विदर्भ संघाने प्रथम गोलंदाजी केली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना फैझ फैझल (२६) आणि अथर्व यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. फझल बाद झाल्यानंतर अथर्वने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत संघाच्या धावगतीला कमालीचा वेग दिला आणि गणेश सतीशसोबत दुसऱ्या गड्यासाठी ११८ धावांची भागीदारी करत विदर्भाचा विजय स्पष्ट केला. सतीशने ५३ चेंडूंत ४३ धावा काढत अथर्वला चांगली साथ दिली. यानंतर यश राठोडसोबतही नाबाद ११८ धावांची भागीदारी करत अथर्वने विदर्भाचा विजय निश्चित केला. यशने ४८ चेंडूंत नाबाद ४४ धावा केल्या.
त्याआधी, आदित्य सरवटे (३/४५) आणि यश ठाकूर (३/७४) यांनी दमदार मारा करत आंध्र प्रदेशला तीनशेपलीकडे जाऊ दिले नाही. आंध्रकडून सलामीवीर सीआर गणेश्वरने १२६ चेडूंत ७ चौकारांसह ९३ धावा, तर अनुभवी अंबाती रायुडूने ४९ चेंडूंत २ चौकार व ३ षट्कारांसह ५३ धावा केल्या. पिनिंती तपस्वीने २५ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ४५ धावांचा तडाखा दिल्याने आंध्रला आव्हानात्मक मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलकआंध्र प्रदेश : ५० षटकांत ८ बाद २८७ धावा (सीआर गणेश्वर ९३, अंबाती रायुडू ५३, पिनिंती तपस्वी नाबाद ४५; आदित्य सरवटे ३/४५, यश ठाकूर ३/७४) पराभूत वि. विदर्भ : ४१.४ षटकांत २ बाद २८८ धावा (अथर्व तायडे नाबाद १६४, यश राठोड नाबाद ४४, गणेश सतीश ४३; हरिशंकर रेड्डी १/२३, चिपुरापल्ली स्टीफन १/४६.)