Join us  

वनडेत 'डबल सेन्चुरी'; १७ वर्षांच्या पोरानं तेंडुलकर, रोहित, वीरूलाही टाकलं मागे

एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम केला नावावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 2:38 PM

Open in App

मुंबईच्या यशस्वी जैस्वालनं बुधवारी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं विजय हजारे चषक वन डे स्पर्धेत द्विशतकी खेळी केली. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना झारखंड संघाविरुद्ध 154 चेंडूंत 203 धावा चोपल्या. लिस्ट A क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूनं झळकावलेलं हे नववं द्विशतक आहे, तर सातवा फलंदाज आहे. विशेष म्हणजे यशस्वी केवळ 17 वर्ष 292 दिवसांचा आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा यशस्वी हा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.

यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेतील हे दुसरे द्विशतक आहे. केरळच्या संजू सॅमसननं आठवड्यापूर्वी गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे चषक स्पर्धेतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती. त्यानं कर्ण वीर कौशलचा 202 धावांचा विक्रम मोडला. यशस्वी आता संजू व कौशल यांच्या पक्तिंत बसला आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये रोहित शर्मानं सर्वाधिक 3 द्विशतकं झळकावली आहेत. त्यानंतर विरेंद्र सेहवाग, शिखर धवन व सचिन तेंडुलकर यांचा क्रमांक येतो. 

यशस्वीच्या या खेळीनं मुंबईने झारखंडविरुद्ध 3 बाद 358 धावांचा डोंगर उभा केला. या स्पर्धेत एखाद्या संघानं केलेली ही चौथी सर्वोत्तम खेळी आहे.  यशस्वी आणि आदित्य तरे यांनी पहिल्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी केली. तरेनं 102 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 78 धावा केल्या. त्यानंतर सिद्धेश लाड ( 32) आणि श्रेयस अय्यर ( 31*) यांनी ताबडतोड खेळी केली. यशस्वीनं 154 चेंडूंत 17 चौकार व 12 षटकार खेचून 203 धावा चोपल्या. यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम यशस्वीनं नावावर केला. 

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आशिया चषक ( 19 वर्षांखालील) स्पर्धेत यशस्वी प्रकाशझोतात आला. त्यानं श्रीलंकेविरुद्ध 85 चेंडूंत 113 धावांची केळी करत संघाला 144 धावांनी विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत यशस्वीनं 74.05च्या स्ट्राईक रेटनं 294 धावा केल्या होत्या. त्यात चार अर्धशतकांचा समावेश होता.   

टॅग्स :मुंबईझारखंडरोहित शर्मासचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागशिखर धवन