Join us  

Vijay Hazare Trophy Final: हिमाचल प्रदेशचा तामिळनाडूवर थरारक विजय; रचला नवा इतिहास

दिनेश कार्तिकच्या शतकावर शुभम अरोराचं शतक भारी पडलं. रिषी धवनने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 6:49 PM

Open in App

Vijay Hazare Trophy Final: भारताच्या देशांतर्गत स्पर्धांपैकी एक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेशनेतामिळनाडू संघावर थरारक विजय मिळवला. तामिळनाडूच्या संघाने दिनेश कार्तिकच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर ५० षटकात ३१४ धावा केल्या. हिमाचल प्रदेशचा सलामीवीर शुभम अरोरा याने ठोकलेल्या दमदार शतकामुळे आणि शेवटच्या टप्प्यात कर्णधार रिषी धवनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हिमाचल प्रदेशने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. कोणत्याही देशांतर्गत स्पर्धांमध्ये हिमाचल प्रदेश संघाचे हे पहिलेवहिले विजेतेपद ठरले.

हिमाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय पूर्णपणे फसला. तामिळनाडूचे पहिले चार गडी झटपट बाद झाल्यानंतर अनुभवी दिनेश कार्तिक मैदानात आला. त्याला बाबा इंद्रजीत आणि शाहरूख खान यांची चांगली साथ मिळाली. दिनेश कार्तिकने १०३ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११६ धावा केल्या. बाबा इंद्रजितने ८० तर शाहरुख खानने ४२ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर तामिळनाडूने ३१४ धावा केल्या.

३१५ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर प्रशांत चोप्रा २१ धावांवर तर दिग्विजय रंगी शून्यावर बाद झाला. निखीलदेखील १८ धावा काढून माघारी परतला. पण अनिल कुमारने सलामीवीर शुभम अरोराला चांगली साथ दिली. अनिल कुमारने ७४ धावांची खेळी केली. कर्णधार रिषी धवन आणि शुभम आरोरा यांनी सामना पुढे सुरू ठेवला. शुभम अरोराने धडाकेबाज खेळी करत शतक ठोकले. त्याने १३ चौकार आणि एक षटकार खेचत नाबाद १३६ धावा केल्या. तर रिषी धवनने २३ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. व्यत्ययामुळे जेव्हा सामना थांबवावा लागला त्यावेळी हिमाचल प्रदेशची धावसंख्या ४ बाद २९९ होती. सामना थांबवताच व्ही जयेदवन (VJD) पद्धतीप्रमाणे आव्हानाची चाचपणी करण्यात आली. त्यावेळी हिमाचल प्रदेशचा संघ ११ धावांनी विजयी झाला.

टॅग्स :विजय हजारे करंडकदिनेश कार्तिकहिमाचल प्रदेशतामिळनाडू
Open in App