Join us

शेवटच्या ओव्हरमध्ये पांड्याच्या संघानं जोर लावला; पण २ विकेट्स गमावल्यामुळं सेमीचं समीकरण फिरलं

शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात कर्नाटकच्या संघानं बाजी मारत सेमीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:14 IST

Open in App

विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत वनडे स्पर्धेतील दोन सेमी फायनलिस्ट संघ ठरले आहेत. महाराष्ट्र संघापाठोपाठ कर्नाटकच्या संघानं बडोदा संघाला शह देत या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघानं घरच्या मैदानात धावांचा पाठलाग करताना सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. पण शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात कर्नाटकच्या संघानं बाजी मारली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

 देवदत्तच्या शतकाला शतकी रिप्लाय आला, पण तरीही बडोदाला जिंकता आला नाही सामना 

पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकच्या संघानं देवदत्त पडिक्कलचे १०२ (९९) दमदार शतक आणि के व्ही अनीश ५२ (६४) याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ८ बाद २८१ धावा करत बडोदा संघासमोर २८२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना बडोदा संघाकडूनही एक शतक आणि एक अर्धशतक आले. सलामीवीर शाश्वत रावत याने १२६ चेंडूत १०४ धावा केल्या. दुसरीकडे बडोदा संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अतित सेठनं ५९ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर बडोदा संघानं सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला.अखेरच्या षटकात संघाला सेमीच तिकीट मिळवण्यासाठी १३ धावांची गरज होती. या षटकात एक चौकार आला. पण दोन विकेट्स गमावल्यामुळे सामना कर्नाटकच्या बाजूनं फिरला. कर्नाटक संघानं ५ धावांनी विजय मिळवत सेमी फायनल गाठली.  

अखेरच्या षटकातील थरार! १३ धावांची गरज असताना एक चौकार आला, पण...

धावांचा पाठलाग करताना बडोदा संघाने ४९ व्या षटकात धावफलकावर ८ बाद २६९ धावा लावल्या होत्या. २ विकेट्स हातात असताना संघाला अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती. कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालनं निर्णायक षटकासाठी अभिलाष शेट्टीकडे चेंडू सोपवला. त्याने दोन विकेट्स घेतल्या होत्या. पण तो सर्वात महागडा गोलंदाजही ठरला होता. पहिल्या चेंडूवर त्याने फक्त एक धाव दिली.  दबाव ५ चेंडूत १२ धावांची गरज असल्यामुळे बडोदा संघावरील दबाव वाढला. परिणामी अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बडोदा संघानं रन आउटच्या रुपात नववी विकेट गमावलीय.  त्यानंतर एक सिंगल आली आणि शेवटच्या चेंडूत विजयासाठी ११ धावा उरल्या होत्या. भार्गव  भट्टनं चौथ्या चेंडूवर चौकार मारत सामन्यात ट्विस्ट आणले. अखेरच्या दोन चेंडूवर पांड्याच्या संघाला ७ धावांची गरज होती. भार्गव भट्टवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण पाचव्या चेंडूवर त्याला मोठा फटका खेळता आला नाही. एवढेच नाही तर दोन धावा घेऊन स्ट्राइकवर येण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् बडोदा संघानं शेवटची विकेटही गमावली.     

सेमीफायनल अन् फायनल कधी?

गुजरात आणि हरयाणा यांच्यात १२ जानेवारीला पहिली क्वार्टर फायनल लढत रंगणार आहे. या सामन्यातील विजेता पहिल्या सेमीफायनलमध्ये कर्नाटक विरुद्ध भिडेल. ही लढत बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर १५ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. १६ जानेवारीला महाराष्ट्र आणि विदर्भ विरुद्ध राजस्थान यांच्यातील विजेत्यांमध्ये दुसरी सेमीफायनल खेळवण्यात येईल. सेमीफायनलमधील दोन विजेते संघ १८ जानेवारीला कोटांबी स्टेडियमवर फायनल खेळताना दिसतील.  

टॅग्स :विजय हजारे करंडककर्नाटकदेवदत्त पडिक्कलक्रुणाल पांड्या