भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी धडपडत असलेला इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड हे दोघे देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्यातील क्षमता दाखवून पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्यासाठी मैदानात उतरले आहेत. विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या वनडे मॅचेसमध्ये इशान किशन हा झारखंड संघाचे नेतृत्व करत आहे. दुसरीकडे ऋतुराज गायकवाड हा महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसतय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा माहोल तयार होत असताना या स्टार क्रिकेटर्ससाठी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खूपच महत्त्वाची झालीये. दोघांनीही आपापल्या संघाकडून धमाकेदार सेंच्युरी ठोकून ICC Champions Trophy स्पर्धेच्या शर्यतीत आम्हीही आहोत, याचे संकेतच दिले आहेत. इशान किशननं ६४ चेंडूत झळकावली सेंच्युरी
विकेट किपर बॅटर इशान किशन याने 'अ' गटातील जयपूरच्या मैदानात रंगलेल्या मणिपूर विरुद्धच्या सामन्यात ७८ चेंडूत १३४ धावांची कडक खेळी केली. झारखंड संघाच्या डावाची सुरुवात करताना केलेल्या दमदार खेळीत इशानच्या भात्यातून १६ चौकार आणि ६व षचकार पाहायला मिळाले. त्याने फक्त ६४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर झारखंड संघाने ८ विकेट्स राखून सामना खिशात घातला.
पहिल्या विकेटसाठी १९६ धावांची दमदार भागीदारी
मणिपूरच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना झारखंडसमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इशान किशनच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने २८.३ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान अगदी सहज पार केले. कॅप्टन इशान किशन याने उत्कर्ष सिंह (६८ धावा) च्या साथीनं पहिल्या विकेटसाठी १९६ धावांची भागीदारी रचली. २३ व्या षटकात इशान किशनच्या रुपात झारखंडच्या संघाने पहिली विकेट गमावली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेआधी इशान किशन याने बुची बाबू टूर्नामेंट, दुलीप करंडक आणि रणजी करंडक स्पर्धेतही शतक झळकावल्याचे पाहायला मिळाले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील ही कामगिरी पाहून बीसीसीआय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडणार का? ते पाहण्याजोगे असेल.
ऋतुराज गायकवाडनंही दाखवला शतकी तोरा; नाबाद १४८ धावांसह जिंकून दिला सामना
विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या वनडे मॅचेसमधील 'ब' गटातील लढतीत महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं सर्विसेस विरुद्धच्या लढतीत आपल्या बॅटिंगमधील जलवा दाखवून दिला. त्याने ७४ चेंडूत १६ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने नाबाद १४८ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने फक्त ५७ चेंडूत सेंच्युरी झळकावली. सर्विसेसनं महाराष्ट्र संघासमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाडनं ओम भोसले (२४ धावा) साथीनं पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी रचली. ९ व्या षटकात ओम भोसलेच्या रुपात महाराष्ट्र संघाला पहिला धक्का बसला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या सिद्धेश वीरच्या साथीनं ११९ धावांची नाबाद भागीदारी करत ऋतुराजनं संघाला ९ विकेट्स राखून विजय मिळून दिला.