Vijay Hazare Trophy 2024-25 Mumbai vs Hyderabad Match : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 'क' गटातील मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मुंबई संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबईकर गोलंदाजांनी कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवत हैदराबादच्या संघाला अवघ्या १६९ धावांत आटोपले. १७० धावांचे टार्गेट मुंबईचा संघ अगदी सहज पार करेल, असे वाटत होते. पण लो स्कोअरिंग मॅचमध्ये चांगलाच थरार पाहायला मिळाला.
मुंबईचा संघ संकटात असताना कॅप्टन श्रेयस अय्यरच्या भात्यातून पाहायला मिळाली फटकेबाजी
अल्प धावसंख्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ अडखळला. सामना हातून निसटतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी कॅप्टन श्रेयस अय्यर मदतीला धावला. त्याने तुफान फटकेबाजी करत संघावरील पराभवाचे संकट टाळणारी जबरदस्त खेळी केली. त्याच्या खेळीमुळे मॅच मुंबईच्या बाजूनं फिरली.
सलामीवीरांनी धमाक्यात करून दिली सुरुवात; पण त्यानंतर कोलमडला हैदराबादचा डाव
पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघाकडून तन्मय अग्रवाल आणि अभिरात रेड्डी या जोडीनं संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचली. सलामी जोडीच्या कामगिरीमुळे हैदराबादचा संघ निर्धारित ५० षटकात २५० धावांपर्यंत अगदी सहज पोहचेल, असे वाटत होते. पण विकेट्स पडण्याचा सिलसिला सुरु झाला अन् हैदराबादचा संघ स्वस्तात आटोपला. तन्मय ६४ धावा, अभिरातनं केलेल्या ३५ धावांशिवाय विकेट किपर बॅटर अरावेले अवनीश याने ५२ धावांची महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त खेळी केलीय त्यामुळे हैदराबादच्या संघाला १६९ धावांपर्यंत मजल मारता आली.
नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला अय्यर
१७० या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईच्या संघानं १०५ धावांवर सात विकेट्स गमावल्या होत्या. मध्यफळीत खेळणारा श्रेयस अय्यर या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने तनुष कोटियानच्या साथीनं मुंबईचा डाव सावरत संघाला पराभवाच्या संकटातून वाचवणारी खेळी केली. तनुषनं नाबाद ३९ धावांची खेळी केली. दुसरीकडे श्रेयस अय्यरनं २० चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने २२० च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटतं संघावरील संकट टाळले.