विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अभिषेक शर्माच्या भात्यातून धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. देशांतर्गत वनडे स्पर्धेत पंजाबकडून खेळताना सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ६० चेंडूत शतक पूर्ण केले. अहमदाबादच्या गुजरात कॉलेज ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यात पंजाबचा संघ पहिल्यांदा बॅटिंगला मैदानात उतरला. अभिषेकशिवाय या सामन्यात त्याच्यासोबत पंजाबच्या डावाची सुरुवात करणाऱ्या प्रभसिमरन सिंगनं धमाकेदार शतक साजरे केले.
अभिषेक-प्रभसिमरन जोडीनं पहिल्या विकेटसाठी केली २९८ धावांची भागीदारी
अवघ्या ६० चेंडूत शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्मानं प्रभसिमरन सिंगच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी २९८ धावांची भागीदारी रचली. प्रभसिमरनसिंगच्या रुपात पंजाबच्या संघाने आपली पहिली विकेट गमावली. ९५ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने १३१.५८ च्या सरासरीनं १२५ धावा केल्या.
२२ चौकार अन् ८ षटकारासह अभिषेक शर्मानं कुटल्या १७० धावा
पंजाबच्या धावफलकावर ३०१ धावा लावून अभिषेक शर्मा माघारी फिरला. त्याने ९६ चेंडूत २२ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने १७० धावांची खेळी केली. ३२ व्या षटकात त्याने आपली विकेट गमावली. जर तो दोन तीन ओव्हर टिकला असता तर त्याच्या भात्यातून द्विशतक पाहायला मिळाले असते.
पंजाबच्या संघाने निर्धारित ५० षटकात केल्या ४२४ धावा
अभिषेक आणि प्रभसिमरन सिंग या दोघांच्या खेळीनंतर नेहाल वढेरा २३ (१८) अनमोल मल्होत्रा ४८ (४५)आणि सनवीरसिंग ४० (२९) धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबच्या संघाने निर्धारित ५० षटकात ४२४ धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धोत कोणत्याही संघाने आतापर्यंत उभारलेली ही पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ५ सामन्यात अभिषेक शर्माच्या भात्यातून पहिले शतक पाहायला मिळाले. याआधीच्या ४ सामन्यात त्याने १३४ धावा केल्या होत्या. यात ६६ ही त्याची सर्वोच्च खेळी होती. मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने ही खेळी केली होती.