Vijay Hazare Trophy 2025 Varun Chakaravarthy Five Wicket Haul : कसोटीतील वाईट कामगिरीची कसर भरुन काढण्यासाठी टीम इंडिया व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये जोमानं खेळेल, अशी आशा आहे. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील टी-२० आणि वनडे मालिकेसह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत व्यग्र दिसतोय. या आगामी स्पर्धेसाठी संघात कोणाची निवड होणार? याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगतीये. यात आता भारताच्या मिस्ट्री स्पिनरनं देशांतर्गत वनडेत 'पंजा' मारत आपली दावेदारी ठोकलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देशांतर्गत वनडेत मिस्ट्री स्पिनरचा 'पंजा', आता टीम इंडियाच्या वनडे संघात मिळू शकते एन्ट्री
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून दमदार कामगिरी करुन दाखवत टीम इंडियाच्या टी-२० संघात वर्णी लावलेल्या वरुण चक्रवर्तीनं विजय हजारे स्पर्धेतील राजस्थान विरुद्धच्या लढतीत पाच विकेट्स घेत बीसीसीआय निवडकर्त्यांचे लक्षेधून घेतले आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याला वनडे संघात एन्ट्री मिळू शकते.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ठोकली मजबूत दावेदारी
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दुसरी प्रीलिमिनरी क्वार्टर फायनल लढत राजस्थान विरुद्ध तामिळनाडू यांच्यात रंगली आहे. बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात राजस्थानचा अर्धा संघ एकट्या वरुण चक्रवर्तीनं तंबूत धाडला. चक्रवर्तीच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर राजस्थानचा संघ अवघ्या २६७ धावांवर आटोपला. मिस्ट्री स्पिनर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वरुण चक्रवर्तीनं १० षटकात ५२ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यांच्या मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दावेदारी भक्कम करणारी आहे. देशांतर्गत वनडेत टॉप क्लास परफॉमन्स
११ जानेवारीला बीसीसीआय निवडर्ते, टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा होणं अपेक्षित आहे. कुलदीप यादवच्या फिटनेसचा मुद्दा आणि त्यात वरुण चक्रवर्तीची दमदार कामगिरी यामुळे या फिरकीपटूला वनडेत संघात एन्ट्री मिळू शकते. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वरुण चक्रवर्तीनं १८ विकेट्स सह टॉपला आहे.