विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनल लढतीत कर्नाटकच्या संघानं हरयाणाचा खेळ खल्लास करत फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना हरयाणा संघानं निर्धारित ५० षटकात ९ बाद २३७ धावा करत कर्नाटकच्या संघासमोर २३८ धावांचे टार्गेट सेट केले होते. देवदत्त पडिक्कलसह ८६ (११३) आणि स्मरन रविचंद्रन ७६ (९४) यांनी केलेल्या क्लास अर्धशतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकच्या संघाने ५ विकेट्स आणि १६ चेंडू राखून सामना खिशात घालत फायनल गाठली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्नाटक संघानं पाचव्यांदा गाठलीये फायनल; याआधीचा रेकॉर्ड एकदम खास
बीसीसीआय अंतर्गत रंगणाऱ्या देशांतर्गत वनडे स्पर्धेत कर्नाटकचा संघ पाचव्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. याआधी चार वेळा खेळलेल्या फायनलमध्ये त्यांनी बाजी मारली आहे. याचा अर्थ हा संघ फायनलमध्ये पोहचला की, ट्रॉफीवर नाव कोरल्याशिवाय मागे फिरत नाही, असा खास रेकॉर्ड कर्नाटक संघाच्या नावे आहे. पुन्हा ते जेतेपदाचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
हरयाणाकडून फक्त दोघांनी दाखवली लढण्याची धमक, पण एकही आली नाही फिफ्टी
मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटक संघाने पहिल्या सेमी फायनलमधील लढतीत टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना हरयाणा संघ अडखळत खेळताना दिसून आले. कर्णधार अंकित कुमार याने संघाकडून सर्वाधिक ४८ धावा केल्या. त्याच्याशिवाय हिमांशु राणा याने ४४ धावांची खेळी केली. ही जोडी वगळता हरयाणाकडून अन्य कोणत्याही फलंदाजाला दमदार खेळ करता आला नाही. परिणामी संघाचा डाव निर्धारित ५० षटकांत ९ बाद २३७ धावांपर्यंतच पोहचू शकला.
दोघांच्या संयमी अर्धशतकामुळे कर्नाटकच्या बाजूनं फिरली मॅच
हरयाणा संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कर्नाटक संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार मयंक अग्रवाल खातेही न उघडता तंबूत परतला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि अनीश या जोडीनं संघाचा डाव सावरला. अनीश २२ धावांवर बाद झाल्यावर स्मरन रविचंद्रच्या साथीनं देवदत्त पडिक्कल याने १२८ धावांची भागीदारी करत कर्नाटकच्या विजयाचा पाया भक्कम केला. स्मरन रविचंद्रन याने ९४ चेंडूत ७६ धावांची संयमी खेळी केली. दुसरीकडे देवदत्त पडिक्कल याने ११३ चेंडूत ८६ धावा ठोकल्या.
फायनल कधी?
महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ यांच्यात १६ जानेवारी, २०२५ रोजी दुसरा सेमी फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. यांच्यातील विजेत्यासोबत कर्नाटक संघ फायनल खेळताना दिसेल. विजय हजारे स्पर्धेतील अंतिम सामना शनिवारी १८ जानेवारी, २०२५ रोजी बडोदाच्या मैदानात रंगणार आहे.