पणजी - विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धेत गोव्याने मंगळवारी शानदार विजय नोंदवला. अनेक दिवसांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवा संघाला तामिळनाडूविरुद्धच्या विजयाने मोठा दिलासा मिळाला. उल्लेखनीय म्हणजे, हा स्पर्धेतील मोठा उलटफेर ठरला. या निकालाने गतविजेत्या तामिळनाडूला मोठा झटका बसला. या सामन्यात हिरो ठरला तो स्वप्नील अस्नोडकर. त्याच्या तडाखेबंद १०३ धावांच्या जोरावर गोव्याने ४ गड्यांनी बाजी मारली. हा सामना चेन्नईतील एम. ए. चिदंबरम मैदानावर खेळविण्यात आला.
स्पर्धेतील ‘क’ गटातील या पहिल्या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्णयानुसार, त्यांनी चांगली सुरुवात केली होती. कौशिक गांधी (४१), मुरली विजय (५१) आणि बाबा अपराजीत (५२) या त्रिकुटाच्या जोरावर संघ मोठी धावसंख्या गाठेल असे वाटत होते. मात्र, त्यांनी अखेरचे सहा फलंदाज अवघ्या ४४ धावांवर गमावले. त्यांनी ४८.५ षटकांत २१० धावा केल्या. हे आव्हान गोव्याने ४६.२ षटकांत गाठले.
पहिल्या गड्यासाठी विजय-कौशिक या जोडीने ८९ धावांची भागीदारी केली. ही जोडी विजेश प्रभुदेसाई याने फोडली. श्रीनिवास फडते याने मुरली विजयला बाद करीत गोव्याला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कौशिकला पायचित बाद करीत विजेश प्रभुदेसाईने दुसरा धक्का दिला. दर्शन मिशाळने नवख्या विजय शंकरला बाद केले. एका बाजूने बाबा अपराजीत चांगली फटकेबाजी करीत होता. त्याला वॉशिंग्टन सुंदर याने साथ दिली. या जोडीने १६६ धावापर्यंत संघाला आणले. श्रीनिवास फडते याने सुंदर याला मोक्याच्या क्षणी बाद केले. सुंदर हा बाद होताच तामिळनाडूची घसरण सुरू झाली. श्रीनिवास फडते आणि दर्शन मिशाळ (प्रत्येकी ३ बळी) यांच्या माºयापुढे मैदानात उतरणारे फलंदाज स्वस्तात बाद झाले. तळात आर. आश्विनने सर्वाधिक ८ धावा केल्या. गोव्याकडून लक्ष्य गर्ग आणि विजेश प्रभुदेसाई यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरात, सलामीवीर स्वप्नील अस्नोडकरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ११२ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकरांच्या जोरावर १०३ धावांची खेळी केली. कर्णधार सगुण कामतने ३८ धावांचे योगदान दिले. अमोघ देसाई १७, स्नेहल कवठणकर १५ आणि सुयश प्रभुदेसाईने १९ धावांचे योगदान दिले. तामिळनाडूकडून रविचंद्रन आश्विनने २ तर क्रिस्त, राहिल शाह, विजय शंकर आणि बाबा अपराजीत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विजयानंतर गोव्याला ४ गुण प्राप्त झाले.