VIJAY HAZARE TROPHY - विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत गोवा संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. नागालँडविरुद्धच्या लढतीत गोवाने लिस्ट ए क्रिकेटमधील त्यांच्या सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडला आणि २३२ धावांनी विजयही मिळवला. मुंबई संघ सोडून गोवाकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
प्रथम फलंदाजी करताना गोवा संघाने ५० षटकांत ६ बाद ३८३ धावांचा डोंगर उभा केला. लिस्ट ए क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१२ मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशविरुद्ध ७ बाद ३८३ धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात स्नेहल कौठणकरने ११८ चेंडूंत १० चौकार व १ षटकारांच्या मदतीने ११४ धावा केल्या, तर सुयश प्रभुदेसाईने ८१ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १३२ धावांची वादळी खेळी केली. राहुल त्रिपाठीने १६ चेंडूंत ३४ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात मैदानवार उतरलेल्या नागालँडचा संपूर्ण संघ ३९.१ षटकांत १५१ धावांत तंबूत परतला. कर्णधार आऱ जॉनथन याने संघाकडून सर्वाधिक ५५ धावा केल्या. त्याला आर जगनथसिनिवास ( २१), तहमीद ( १४) यांनी मदत केली. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. अर्जुनने १०-०-३०-४ अशी स्पेल टाकली. दर्शन मिसाळने दोन, तर लक्ष्य गर्ग, विजेश प्रभुदेसाई, मोहित रेडकर व सुयश यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.