Hardik Pandya Fails To Fire In First 50 Over Match In Vijay Hazare Trophy 2024 : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या फेरीत हैदराबादच्या जिमखाना ग्राउंडवर शनिवारी 'इ' गटातील बंगाल आणि बडोदा यांच्यातील सामना खेळवण्यात आला. हा सामना भारतीय संघातील स्टार ऑल राउंडर हार्दिक पांड्यासाठी खास होता. कारण तब्बल १४ महिन्यांनी तो ५० षटकांचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पण वनडेतील कमबॅकच्या सामन्यात हार्दिक पांड्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्याच्या निराशजनक कामगिरीसह बडोदा संघालाही पराभवाचा सामना करावा लागला.
हार्दिक पांड्याचं १४ महिन्यांनी वनडेत कमबॅक; अनकॅप्ड बॉलरसमोर २ चेंडूत खेळ केला खल्लास
हार्दिक पांड्या वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता. या सामन्यातील दुखापतीनंतर तो वनडे संघाबाहेर गेला. भारतीय टी-२० संघात त्याने दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. आता आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत वनडे सामन्यात तो कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. वनडेत पहिल्या सामन्यात त्याची अडखळत सुरुवात झालीये. बंगाल विरुद्धच्या सामन्यात २ चेंडूचा सामना करून तो एका धावेवर बाद झाला. प्रदीप्ता परमानिक या अनकॅप्ड गोलंदाजाने त्याचा खेळ अल्पावधीत खल्लास केला.
हार्दिक पांड्याने गोलंदाजीत ७ षटकात घेतली एक विकेट
हार्दिक पांड्याने बंगाल विरुद्धच्या सामन्यात ७ षटके गोलंदाजी केली. यात त्याने ३३ धावा खर्च करून एक विकेट घेतली. पण संघाला मात्र या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्या वैयक्तिक कारणास्तव विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्याला मुकला होता. आता उर्वरित सामन्यात छाप सोडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियात दावेदारी ठोकण्यासाठी तो कितपत यशस्वी ठरणार ते पाहण्याजोगे असेल.
बंगालनं ७ गडी अन् ७ षटके राखून जिंकला सामना
क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ४८. ५ षटकात २२८ धावा कोल्या होत्या. संघाकडून शाश्वत रावतनं १११ चेंडूत ९५ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याची ही खेळी वगळता बडोदा संघाकून अन्य कुणालाही फलंदाजीत दम दाखवता आला नाही. कर्णधार क्रुणाल पांड्याही ८ चेंडूचा सामना करून फक्त ३ धावांवर बाद झाला. बंगालकडून सायन घोष आणि प्रदीप्ता परमानिक यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. बडोदा संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बंगालच्या संघानं ७ गडी आणि ७ षटके राखून विजय मिळवला. या संघाकडून अनुस्तुप मजूमदार याने १०६ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९९ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय सुमांता गुप्तानं ८० चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या.
Web Title: Vijay Hazare Trophy Hardik Pandya Fails To Fire In First 50 Over Match After 14 Months Bengal won by 7 wkts Against Baroda
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.