Vijay Hazare Trophy Final, KAR seals 36-run win against VID to Lift Fifth Title : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील फायनल लढतीत मयंक अग्रवालच्या कर्नाटक संघानं विदर्भ संघाला पराभूत करत पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. फायनलमध्ये पोहचलो की, ट्रॉफी आमचीच, हा सीन कर्नाटक संघाने पुन्हा एकदा दाखवून दिला. बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या कोटांबी स्टेडियमवर रंगलेल्या फायनल लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करताना कर्नाटकच्या संघानं निर्धारित ५० षटकात ६ बाद ३४८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्यांदाच फायनल खेळणारा विदर्भ संघ ४८.२ षटकात ३१२ धावांवर आटोपला. कर्नाटक संघानं ३६ धावांनी सामना जिंकत यंदाच्या हंगामाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्नाटकची पहिली बॅटिंग; आघाडीचे फलंदाज स्वस्तात परतले माघारी
विदर्भ संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालनं देवदत्त पडिक्कलच्या साथीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या २३ धावा असताना देवदत्त पडिक्कल ८ (१९) च्या रुपात कर्नाट संघाला पहिला धक्का बसला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या अनिश २७ चेंडूत २३ धावा करून माघारी फिरला. त्याच्या पाठोपाठ कर्नाटकच्या संघानं मयंक अग्रवालची विकेही गमावली.
कर्नाटक संघाकडून रविचंद्रनच्या शतकासह या दोघांनी मारली फिफ्टी
कर्नाटकच्या कर्णधाराननं ३८ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत ३१ धावांची भर घातली. पहिल्या तीन विकेट्स स्वस्तात माघारी फिरल्यावर समरन रविचंद्रन आणि क्रिशनन श्रीजित ही जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. क्रिशनन याने ७४ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७८ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला समरन रविचंद्रन याने शतक साजरे केले. त्याने ९२ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १०१ धावांची दमदार खेळी केली. अखेरच्या षटकात अभिनव मनोहरच्या भात्यातून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याने ४२ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ७९ धावा केल्या. हार्दिक राज ५ चेंडूत १२ आणि श्रेयस गोपाळ याने ४ चेंडूत नाबाद ३ धावांची खेळी करत कर्नाटकच्या संघाच्या धावफलकावर निर्धारित ५० षटकात ३४८ धावा लावल्या. विदर्भ संघाकडून दर्शन नलकांडे आणि भुटे यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय यश ठाकूर आणि यश कदम याला एक विकेट मिळाली.
विदर्भ कॅप्टन्स करुण नायर स्वस्तात आटोपला; शौर्यच्या शतकी खेळीनंतर दुबेची कडक फिफ्टी, पण
कर्नाटकच्या संघानं सेट केलेल्या ३४९ धावांचा पाठलाग करताना कर्नाटक संघाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर ३२ धावा असताना यश राठोडच्या रुपात विदर्भ संघाला पहिला धक्का बसला. हा सलामीवीर १९ चेंडूत २२ धावा करून परतला. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा विदर्भ संघाचा कॅप्टनही या सामन्यात फार मोठी खेळी करू शकला नाही. प्रसिद्ध कृष्णानं करुण नायरला २७ धावांवर बाद केले. यश कदम १५ (२०), जितेश शर्मा ३४ (४३), शुभम दुबे ८ (१४) अपूर्व वानखेडे १२ (११) ही मंडळी स्वस्तात माघारी फिरली. सलमीवर ध्रुव शौर्य याने १११ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ११० धावा केल्या. अखेरच्या षटकात हर्ष दुबेनं तुफान फटकेबाजी करत विदर्भ संघाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण ३० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारासह ६३ धावांवर त्याची खेळी थांबली अन् ही मॅच कर्नाटकनं जिंकली.