बेंगळुरू : सलग दोनदा विजय हजारे करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या दिल्लीला पराभूत करत मुंबईने जेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईने दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. आदित्य तरे आणि सिद्धेश लाड यांनी चमकदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
दिल्लीने मुंबईपुढे 178 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ फक्त आठ धावा करू शकला, तर अजिंक्य रहाणेला दहा धावाच करता आल्या. त्यानंतर मुंबईने अजून दोन फलंदाज झटपट गमावले आणि त्यांची 4 बाद 40 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर तरे आणि लाड यांनी पाचव्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी रचली आणि मुंबईची गाडी रुळावर आणली. तरेने 13 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 71 धावांची खेळी साकारली. तरे बाद झाल्यावर लाडने दमदार फलंदाजी केली. पण षटकाराच्या जोरावर अर्धशतक झळकावताना तो बाद झाला. सिद्धेशने चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 48 धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, धवल कुलकर्णी आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत दिल्लीचे कंबरडे मोडले. दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरला या सामन्यात फक्त एक धाव काढता आली.