Vijay Hazare Trophy 2024-25: विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी मुंबईच्या संघानं नागालँडविरुद्ध धावांची 'बरसात' केल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या संघानं कर्णधार श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नागालँड विरुद्धच्या लढतीत धावफलकावर ४०३ धावा लावल्या. अय्यरच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करताना शार्दुल ठाकूरनं नाबाद ७३ धावांची धमाकेदार इनिंग खेळली. त्याशिवाय युवा सलामीवीर आयुष म्हात्रेनं १८१ धावांची धमाकेदार खेळी साकारली.
मुंबईकरांकडून तुफान फटकेबाजी, अय्यरच्या अनुपस्थितीत प्रतिस्पर्धी संघाला दिलं ४०० पारचं टार्गेट
स्पर्धेतील पाचव्या फेरीत 'क' गटातील मुंबई आणि नागालँड यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहेे. या सामन्यात नाणेफेक जिंकून नागालँडच्या संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या फलंदाजांनी स्फोटक अंदाजात खेळी करत नागालँडचा निर्णय व्यर्थ ठरवला. आयुष म्हात्रेच्या दमदार शतकी खेळीशिवाय कार्यवाहू कर्णधार शार्दुल ठाकूर याने तोऱ्यात केलेल्या बॅटिंगच्या जोरावर मुंबईच्या संघाने निर्धारित ५० षटकात ७ बाद ४०३ धावा केल्या.
आयुष म्हात्रेचा धमाकेदार खेळी, १५ चौकार अन् ११ षटकारांसह ठोकल्या १८१ धावा
आयुष म्हात्रे आणि अंगकृष रघुवंशी या जोडीनं मुंबईच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. अंगकृष रघुवंशी ५६ धावांवर बाद झाला. दुसऱ्या बाजूला आयुष म्हात्रेनं आपला धमाकेदार शो कायम ठेवला. त्याने ११७ चेंडूत ११ षटकार आणि १५ चौकाराच्या मदतीने १८१ धावांची दमदार खेळी साकारली.
शार्दुल ठाकूरची २८ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी
सिद्धेश लाड आणि प्रसाद पवार यांनी अनुक्रमे ३९ आणि ३८ धावांची खेळी केली. या दोघांनी विकेट गमावल्यावर कार्यवाहू कर्णधार शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला. त्याने २८ चेंडूत ८ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने नाबाद ७३ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ४०३ धावांवर पोहचवली. बॉलिंग ऑल राउंडरच्या रुपात खेळणाऱ्या शार्दुलनं २६०.७१ च्या स्ट्राईक रेटन धावा केल्या.
श्रेयस अय्यरला विश्रांती
नागालँड विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे स्टार बॅटरही प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत ४०० पार धावांचे टार्गेट सेट करत मुंबईच्या संघानं आपल्या फंलदाजीतील ताकद दाखवून दिलीये.
Web Title: Vijay Hazare Trophy Shardul Thakur 73 Runs In 28 Balls With 8 Sixes Ayush Mhatre Scored 181 Runs Mumbai Scored 403 Runs vs nagaland without Shreyas Iyer Out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.