Join us  

मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी विजय पाटील यांचा एकमेव अर्ज, निवडणूक केवळ औपचारीकता

डीवाय पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी मंगळवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी आपला अर्ज भरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 6:14 AM

Open in App

मुंबई : डीवाय पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी मंगळवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी आपला अर्ज भरला. विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी पाटील यांचा एकमेव अर्ज आला असल्याने त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी एमसीए निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची मुदत होती.विजय पाटील यांनी क्रिकेट फर्स्ट गटाकडून अर्ज दाखल केला आहे. आता पाटील यांना बाळ महाडदळकर या प्रतिस्पर्धी गटाकडून अध्यक्षपदासाठी पाठिंबा मिळाला आहे. एमसीएच्या याआधीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाजी मारली होती. मात्र नंतर एमसीएने सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींचा अवलंब केल्याने पवार यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.यंदा पाटील यांच्यापुढे अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे आव्हान निर्माण होण्याचे शक्यता होती. मात्र परस्पर हितसंबंध मुद्दा मार्गात येत असल्याने नाइलाजाने संदीप पाटील यांना माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर दोन्ही प्रतिस्पर्धी गटांनी विजय पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवित अध्यक्षपदाचे चित्र स्पष्ट केले.‘एमसीएतील सर्वच सदस्यांनी, सभासदांनी अध्यक्षपदासाठी मला पाठिंबा दिला यासाठी मी आभारी आहे. संघटनेसाठी काम करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो खूप महत्त्वाच आहे. यामुळे आता माझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. खेळाच्या विकासासाठी मी सर्वोत्तम कामगिरी करेन,’ असे डॉ. विजय पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईनिवडणूक