- अयाझ मेमन
नागपूरचा सामना खूपच रोमांचक होता, ही बाब भारतासाठी नक्कीच चांगली आहे. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढतो. ज्या खेळाडूंचा फॉर्म हरवलेला असतो त्यांना पुन्हा आपला फॉर्म मिळविण्यास मदत होते.
जसे की विजय शंकर, त्याने चांगली फलंदाजी केली. गोलंदाजीतही तो चमकला आणि भारताला विजय मिळवून दिला. जर सामना सोपा झाला असता तर अशा खेळाडूकडे लक्ष गेले नसते. भारताने एकदिवसीय मालिका सुरू होण्याआधी दोन टी-२० सामन्यांत पराभव पत्करला होता. त्यानंतर भारताला विजयी मार्गावर परतायचं ेहोते. भारताने आता दोन सामन्यांची आघाडी घेतली आहे. संघ मजबूत स्थितीत आहे.
भारतीय संघाची फलंदाजी मजबूत मानली जाते; मात्र तेथेच काही समस्या आहे. गोलंदाजीत भारतीय संघ सध्या चांगल्या स्थितीत आहे. मला वाटते की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय इतर खेळाडू सातत्याने चांगला खेळ करण्यात अपयशी ठरले आहे.
शिखर धवनला चांगली सुरुवात मिळते; मात्र त्याचा फायदा त्याला घेता येत नाही. राहुल याने दोन टी-२० मध्ये चांगली कामगिरी केली; मात्र आता त्याला पुन्हा कधी संधी मिळते हे पाहावे लागेल. धोनीही सातत्याने खेळी करू शकलेला नाही. केदार जाधव याने काही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे.
संघातील सहा फलंदाजांपैकी फक्त एका खेळाडूनेच चांगली खेळी करणे योग्य नाही. इतर फलंदाजांनीही सातत्याने योगदान द्यायला हवे. भारतीय गोलंदाज फलंदाजीत फारसे योगदान देऊ शकत नाही. ते त्यांची कामगिरी चांगली करीत आहे. त्यामुळे फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारायला हवी.
विराट कोहली एक ते दीड वर्षातच सचिनचा एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम मोडू शकतो. विश्वचषक क्रिकेट, द्विपक्षीय मालिका होणार आहेत. त्यात तो हा विक्रम नक्कीच करेल.
भारताच्या सलामीवीरांनी सुरुवात करून देणे गरजेचे आहे. सध्या मायदेशात मालिका आहे. सलामीवीरांनी चांगली कामगिरी न केल्यास मधल्या फळीला अडचणींचा सामना करावा लागतो. मायदेशात खेळताना या दबावातून संघ बाहेर येतो. मात्र, परदेशात दबावाचा सामना जास्त करावा लागेल.
रोहित, शिखर आणि राहुल यांना मोठी खेळी करावी लागेल. पहिल्या पाच ते सहा षटकांत जर एक किंवा दोन गडी बाद झाले तर मोठी धावसंख्या उभारणे कठीण होते आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला संधी मिळते.
विश्वचषकासाठी भारतीय संघ आता फारसे प्रयोग करू शकत नाही. एकच प्रयोग केला गेला तो विजय शंकरच्या बाबतीत. हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. आता पुन्हा बाहेर कोणाला बसवतील, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.
हार्दिक पांड्याला संघात घेतले जाईलच. आणखी एका अष्टपैलू खेळाडूची जागा कुणाला मिळते हे बघावे लागेल. रवींद्र जडेजा की विजय शंकर. कारण संघात दोन चांगले फिरकीपटू आहेत. त्यामुळे आणखी एका फिरकीपटूला जागा मिळेल का? संघात १२ ते १३ जागा नक्की झाल्या आहेत.
फक्त दोन ते तीन जागांसाठी खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा आहेत. राखीव यष्टिरक्षकाची जागा कुणाला मिळते हे बघावे लागेल, दिनेश कार्तिक की रिषभ पंत?
Web Title: Vijay Shankar Chakala before World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.