नवी दिल्ली, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणी खेळावे याची चर्चा अजून सुरुच आहे. या चर्चेत अनेक दिग्गजांनी आपापली मतं मांडली आणि यांच्यात भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचीही एन्ट्री झाली आहे.
तो म्हणाला,''परिस्थिती पाहून संघाने हा निर्णय घ्यायला हवा. सध्यातरी विजय शंकरने या क्रमांकावर खेळावे, परंतु संघात लवचिकता असायला हवी. जर आपण वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत आहोत, तर या गोष्टीचा अधिक विचार करण्याची गरज नाही. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहायला हवे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे आघाडीची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील.''
2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चौथ्या क्रमांकासाठी अनेक पर्यायांची चाचपणी झाली. जवळपास 11 खेळाडूंना संधी देण्यात आली, परंतु अखेरीस ज्याच्याकडे पुरेसा अनुभव नाही अशा विजय शंकरची निवड झाली. अंबाती रायुडू या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. सेहवाग म्हणाला,''आता संघ निवड झालेली आहे आणि विराट कोहली व खेळाडूंना आपण पाठींबा द्यायला हवा. त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात. आपण चुकत नाही, तोपर्यंत जिंकत राहू.''
इंग्लंडच्या वातावरणाबद्दल बोलतान तो म्हणाला,''इंग्लंडच्या वातावरणाचा भारतीय खेळाडूंना पुरेसा अनुभव आहे. त्यांना त्यांची जबाबदारी माहीत आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी, याचा फार विचार ते करत नाहीत. सकारात्मक दृष्टीकोनातून हा संघ मैदानावर उतरणार आहे. संघात नकारात्मकता नसायला हवी.''