ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आशिष नेहराची निवड झाली आणि त्याच्या निवडीबद्दल क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. युवा खेळाडूंना पसंती देणाऱ्या निवड समितीने वयाच्या 38 व्या वर्षी नेहराला पुन्हा संधी दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. निवड समितीवर टीकाही झाली आहे. नेहरानं मात्र या गोष्टींचा मी विचार करत नाही, अशी प्रतिक्रिया देत टीकाकारांचं तोंड बंद केलं.
भारतीय क्रिकेटमध्ये तुफान प्रतिस्पर्धा असताना नेहराची निवड कशी झाली?, तुम्ही कधी याचा विचार केला आहे. कोणत्याही बाबीवर टीका करण्यापूर्वी जरा विचार करण गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये वयाच्या 30 वर्षानंतर संघात पुनरागमन करणं किती कठिण असतं हे विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, जॅक कॅलिस, जहीर खान यासारख्या दिग्गजांना माहित आहे. वयाच्या तिशीनंतर यांच्यावर अनेकवेळा संघाच्या बाहेर बसण्याची नामुष्की ओढावली आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेट हा तरुणांचा खेळ आहे, असं म्हटले जातं. पण नेहरानं वयाच्या 38 व्या वर्षी संघात पुनरागमन केलं आहे. सध्याच्या भारतीय क्रिकेट टीममध्ये सर्वाधिक वय असलेला खेळाडू आशिष नेहरा आहे.
बीसीसीआयचं स्पष्टीकरण - आशिष नेहरा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला आजवरचा अखेरचा सामना खेळला तो एक फेब्रुवारी 2017 रोजी. त्यानंतर कांगारुंविरोधात त्याची निवड झाली. नेहराच्या निवडीबाबत बीसीसीआयकडून सांगण्यात आलं, की या वर्षाच्या सुरुवातीला नेहरा भारतीय संघाकडून खेळला आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीतही खेळू शकला असता; पण आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीचा त्याला फटका बसला. आणि म्हणूनच वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यातही त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. खराब फॉर्ममुळे नेहराला कधीच वगळण्यात आलेलं नाही. त्याची तक्रार फक्त फिटनेसच्या बाबतीत होती.
विराट कोहली आधी सात कर्णधाराचं वेगवान अस्त्र होता नेहरा - 19 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहरा सात कर्णधारांबरोबर खेळला आहे. यामध्ये मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश आहे. आणि आता विराट कोहली आठवा कर्णधार असेल. ज्याप्रमाणे आधीच्या कर्णधारासाठी त्यानं आपलं 100 टक्के योगदान दिलं त्याचप्रमाणे तो विराट कोहलीसाठीही वेगवान अस्त्र म्हणून प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणेल. नेहराचा हा अनुभव विराट कोहलीला नक्कीच फायदाचा ठरणार यात काही शंकाच नाही.
नेहराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द -1999 मध्ये नेहराची आंतराष्ट्रीय कारकीर्द अजहरुद्दीनच्या कर्णधारपदाखाली सुरुवात झाली. 38 वर्षीय नेहरा भारताकडून 120 वन-डे सामने खेळला असून, यात त्याने 157 विकेट घेतल्या आहेत. पण त्याने शेवटचा वन-डे सामना 2011 मध्ये खेळला आहे. मात्र, टी-20 साठी तो पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे या वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20त त्याला संधी मिळाली होती. त्याने 26 टी-२० सामन्यांत 34 बळी मिळवले आहेत.
19 वर्षात झाल्या 12 शस्त्रक्रिया- एक वेगवान गोलंदाज म्हणून एकोणीस वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणं हे खरोखरच सोपं नाही. या एकोणीस वर्षांत नेहराला तब्बल बारा शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळेच त्याच्या पुनरागमनाचा सिलसिला कौतुकास्पद ठरतो.
15व्या वर्षी विराटनं घेतला होता नेहराच्या हातून पुरस्कार - विराट कोहली जेव्हा 15 वर्षाचा होता त्यावेळी त्याची सर्वात प्रथम नेहराची भेट झाली होती. त्यावेळी नेहराचं वय होत 24 वर्ष. 2002-03 मध्ये झालेला दक्षिण आफ्रिकेतला विश्वचषक नेहराने चांगलाच गाजवला होता. त्यामुळे दिल्लीतल्या एका स्थानिक स्पर्धेचं पारितोषिक वितरण त्याच्या हस्ते झालं होतं.
या खेळाडूनं वयाच्या 40 व्या वर्षी जिंकून दिला वर्ल्डकप -1992 मध्ये इम्रान खान याने वयाच्या 40 व्या वर्षी कर्णधारपद सांभाळताना पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला होता. 1987 मध्ये त्यांनं क्रिकेटला रामराम ठोकला होता. पण पाकिस्तानच्या त्यावेळ असलेल्या राष्ट्रपती जिया उल हक यांनी त्याला आपला निर्णय बदलायला सांगतिला आणि क्रिकेटमध्ये सक्रिय होण्यास सांगितलं. त्यावेळी इम्रान खानचं वय 35 वर्ष होतं. इम्रान खाननं फक्त संघात पुनरागमनच केलं नाही तर 1992 चा विश्वचषक जिंकून दिला.
...म्हणून झाली नेहराची निवड?जहीर खाननंतर भारतीय संघाकडे दर्जेदार असा डावखुरा वेगवान गोलंदाज मिळाला नाही, नेहरा दुखपतीमुळे सतत आतबाहेर करतोय. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री आणि गोलंदाजी कोच दोघेही डावखुऱ्या गोलंदाजाच्या शोधात आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात नेहराची निवड करण्यात आली असवी. आयपीएलमधून अनेक नवे चेहरे समोर येत आहेत. पण ऑस्ट्रेलियासारख्या दर्जेदार संघासमोर नेहरासारखा अनुभव गोलंदाज योग्य असल्याचे एकमत निवड समितीत झालं असेल.
शेवटी एकच सांगावसं वाटतंय, क्रिकेटच्या मैदानात खेळण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. तुमचा फिटनेस आणि तुमची कामगिरी यावर संघातील स्थान अवलंबून असतं. नेहरा धावांवर अंकुश ठेवून विकेट्स मिळवण्यात यशस्वी झाला, तर तो विश्वचषकातही खेळू शकतो यात दुमत नाही. नेहरानं 26 टी-20 सामन्यांत 34 बळी घेतले आहेत. यावेळी 19 धावा देत 3 बळी ही त्याची उत्कृष्ट कामगिरी आहे. या 26 सामन्यात गोलंदाजी करताना त्याची जवळपास साडेसात धावांची सरासरी आहे. टी-20मध्ये ही काही जास्त वाटत नाही. कारण, जर एखादा गोलंदाज प्रतिओव्हर 7 ते 8 सरासरीनं धावा देत आघाडीच्या फळीतील दोन ते तीन फलंदाजांला बाद करत असेल तर मी त्याला 'विजयाचा मोहरा, आशिष नेहरा' असंच म्हणिन