Join us  

भारत-चीनदरम्यानच्या शांतीसाठी विजेंदरनं देऊ केला चिनी बॉक्सरला खिताब

दोन्ही देशांमध्ये शांती प्रस्थापित व्हावी यासाठी विजेंदरनं चिनी बॉक्सर झुफिकार मैमतअली याला स्वतः जिंकलेला किताब देऊ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 12:31 PM

Open in App

मुंबई, दि. 6 - भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने चीनच्या झुल्फिकार मैमतअली याला अपेक्षेप्रमाणे नमवत व्यावसायिक बॉक्सिंग कारकिर्दीमध्ये सलग नववी लढत जिंकली. या विजयामुळे साहजिकच विजेंदर क्रीडाप्रेमींच्या पसंतीस उतरला. एवढ्यावरच न थांबता विजेंदरनं भारत आणि चीनदरम्यान शांती नांदावी, यासाठी अनोख्या त्यागाचं उदाहरण दिलं.दोन्ही देशांमध्ये शांती प्रस्थापित व्हावी यासाठी विजेंदरनं चिनी बॉक्सर झुफिकार मैमतअली याला स्वतः जिंकलेला किताब देऊ केला. त्यानंतर चीनच्या झुल्फिकार मैमतअली स्वतःची टोपी विजेंदरला दिली. या सर्व प्रकारामुळे क्रीडा प्रेमी अक्षरशः भारावून गेले आहेत. भारत आणि चीनदरम्यानचा वादात थांबवावा, असं आवाहन विजेंदरनं केलं. विजेंदर म्हणाला, मी हा बेल्ट झुल्फिकारला परत करू इच्छितो. मी भारत-चीन नियंत्रण रेषेवर शांती प्रस्थापित करण्याचं अपील करतो. चीननं स्वतःच्या सीमेत राहावा. भारतात घुसखोरी करू नये, शांतीचा संदेश सर्वात महत्त्वपूर्ण आहे. एकूण दहा फे-यांमध्ये झालेल्या या रोमांचक लढतीमध्ये तिन्ही परीक्षकांनी एकमताने विजेंदरला विजयी घोषित केले. पहिल्या पंचाने विजेंदरच्या बाजूने ९६-९३, दुस-या पंचाने ९५-९४, तर तिस-या पंचाने ९५-९४ गुण दिले.सध्या सुरू असलेल्या भारत-चीन सीमावादामुळे वातावरण गंभीर असताना विजेंदर -मैमतअली या लढतीकडे भारत विरुद्ध चीन असा रंग चढला होता. त्यातच या लढतीच्याआधी स्वत: विजेंदरने ही लढत भारत विरुद्ध चीन अशी असल्याचे सांगत रणशिंग फुंकले होते. त्यामुळेच शनिवारी रात्री वाघ बाजी मारणार की ड्रॅगन, अशीच चर्चा बॉक्सिंगप्रेमींमध्ये रंगली होती.वरळीतील एनएससीआय स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत पहिल्या फेरीमध्ये दोन्ही बॉक्सर्सने सावध पवित्रा घेऊन एकमेकांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसºया फेरीपासून आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. मैमतअलीच्या आक्रमक चालींना विजेंदरने जोरदार ठोसे लगावून प्रत्युत्तर दिल्यानंतर प्रेक्षकांनी विजेंदरचा जयघोष केला. या वेळी मैमतअली दबावाखाली आला. तिस-या फेरीमध्ये मैमतअलीने विजेंदरच्या कमरेखाली हल्ला केल्याने पंचांनी त्याला समज दिली. या वेळी मैमतअलीच्या धसमुसळ्या खेळापुढे एक वेळ तोल जाऊन विजेंदर खालीही पडला.दरम्यान, विजेंदर मजबूत स्थितीमध्ये दिसत असतानाच सहाव्या फेरीनंतर मैमतअलीने चांगले पुनरागमन केले. परंतु, बचावावर अधिक भर देताना विजेंदरने आपले नियंत्रण गमावू दिले नाही. सातव्या फेरीमध्ये दोन्ही खेळाडूंचा थकवा स्पष्ट दिसू लागला होता. या वेळी, विजेंदरने आक्रमकतेला मुरड घालताना शारीरिक क्षमता कायम राखण्यावर भर दिला. याचाच त्याला शेवटच्या दोन फेºयांमध्ये फायदा झाला. नवव्या फेरीमध्ये मैमतअलीने पुन्हा एकदा कमरेखाली ठोसा मारल्याने विजेंदर खाली पडला. या वेळी, पंचांनी मैमतअलींना दुसरी समज दिली. तसेच प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवतानाच ‘चीटर... चीटर’ अशा घोषणाही दिल्या. अखेरच्या दहाव्या फेरीत मैमतअली काहीसा आक्रमक दिसला. परंतु, विजेंदरने जबरदस्त नियंत्रण राखताना सलग दोन ठोसे मारत मैमतअलीला दबावाखाली आणले. दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने सामन्याचा निकाल परीक्षकांवर सोपविण्यात आला. या वेळी परीक्षकांनी एकूण गुणांचा विचार करून विजेंदरला विजयी घोषित केले.