भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येत आहे. रवी शास्त्री सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह हेही लंडनमध्ये दाखल झाले आहेत. रवी शास्त्री यांनी ट्वेंटी-२०नंतर पदावर कायम राहण्याची इच्छा नसल्याचे बीसीसीआयला कळवल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यात भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड याचे नाव या पदासाठी चर्चेत होते. पण, राहुल हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( NCA) प्रमुखपदी कायम राहणार आहे, त्यामुळे तोही या शर्यतीतून बाहेर पडला. आता रवी शास्त्री यांच्या टीममधील भीडूच या पदावर विराजमान होणार असल्याचे वृत्त समोर आल्यानं नवा ट्विस्ट आला आहे.
प्रती लिटर ४००० रुपये किमतीचं 'ब्लॅक वॉटर' पितो विराट कोहली; जाणून घ्या त्यामागचं कारण
भारतीय संघाचे सध्याचे फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे नाव पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून समोर येत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी राठोड हे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आहे. राठोड हे अनेक वर्षांपासून रवी शास्त्री यांच्यासोबत काम करत आहेत. राठोड यांचे कर्णधार विराट कोहली याच्यासोबतही चांगले जुळते. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. राठोड यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. रिषभ पंत, विराट व रोहित शर्मा यांची फलंदाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक बहरली आहे.
राठोड यांनी १९९६-९७चा काळ गाजवला. त्यांनी भारताकडून सहा कसोटी व सात वन डे सामने खेळले. स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्येही त्यांनी १४६ सामन्यांत ४९.६६च्या सरसरीनं ११४७३ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांनी ९९ सामन्यांत ३०००हून अधिक धावा केल्या आहेत.