Vinod Kambli Birthday : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी १८ जानेवारीला ५३ वर्षांचा झाला. विनोद कांबळी हा प्रतिभावान क्रिकेटपटू. पण मधल्या काळात तो फारसा चर्चेत नव्हता. सध्या गेल्या काही महिन्यांपासून प्रकृतीच्या कारणांमुळे तो चर्चेत आहे. पण एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर त्याने तुफान आणलंय. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज जाणून घेऊया, विनोद कांबळीचे ९ या क्रमांकाशी असलेले खास कनेक्शन. त्याला ९ क्रमांक इतका आवडायचा की त्याने स्वत:च एका मुलाखतीदरम्यान त्याच्या ९ नंबरच्या कनेक्शनचे रहस्य उघड केले होते.
कांबळीचा ९ या क्रमांकाशी खास संबंध
विनोद कांबळीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की कांबळी त्याच्या बॅटवर ९-९ ग्रिप लावून खेळायचा. त्यामागची गोष्टही त्याने सांगितली. कांबळीच्या मते, एक-दोन ग्रिपमुळे त्याची बॅटवरची पकड मजबूत होत नव्हती. अशा परिस्थितीत तो ९ ग्रिप वापरायचा. कांबळीने सांगितले होते की, मला ९ ग्रिप बसवायला दीड तास लागायचा. त्यामुळे त्याच्या हातालाही फोड यायचे. बॅटवर नऊ ग्रिप लावून खेळतानाच त्याने हिरो कप गाजवला होता. त्याने वेस्ट इंडिज आणि सर्व संघांसमोर धुवाधार फलंदाजी केली होती. तसेच, कांबळीने मुलाखतीत सांगितले होते की, ९ आणि ९ जोडले तर १८ हि माझी जन्मतारीख होते.
वन-डेमध्ये ९ वेळा पुनरागमन
कांबळीचा ९ क्रमांकाशी आणखी एक विशेष संबंध आहे. त्याने टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये नऊ वेळा पुनरागमन केले. हा खुलासा खुद्द कांबळीनेच मुलाखतीत केला. जेव्हा त्याला त्याच्या नऊ पुनरागमनाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'मला इतक्या संधी दिल्याबद्दल मी निवडकर्त्यांचे आभार मानू इच्छितो. नऊ वेळा मी पुनरागमन केले. मी आठ पुनरागमन करणाऱ्या मोहिंदर अमरनाथ यांचा विक्रमही मोडला.' कांबळीने १९९१ ते २००० या दरम्यान ११७ वनडे सामने खेळले आणि २ शतकांच्या मदतीने २४७७ धावा केल्या.