Vinod Kambli gets emotional: भारतीय क्रिकेटमधील ३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईचा धडाकेबाज खेळाडू विनोद कांबळी याने दमदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या सात कसोटींमध्ये ७९३ धावा आणि ११३चा स्ट्राईक रेट अशी त्याची धुवाँधार फलंदाजी सुरू होती. २२४ आणि २२७ ही त्याची त्या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी होती. पण नंतर काही कारणास्तव विनोद कांबळी संघातून बाहेर झाला आणि त्याला नंतर फारशी संधी मिळालीच नाही. या साऱ्या गोंधळानंतर विनोद कांबळी विविध मुद्द्यांमुळे चर्चेत आला होता. पण आता मात्र तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. विनोद कांबळी हा आता कामाच्या शोधात आहे. त्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो आता नोकरी शोधतोय असं त्याने मिडडेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
विनोद कांबळी मुलाखती दरम्यान म्हणाला, "मला 'बीसीसीआय'कडून ३० हजार रूपयांचे पेन्शन दरमहा मिळते. माझ्या उत्पन्नाचा तो एकमेव स्रोत आहे. मी एक निवृत्त क्रिकेटर आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाकडून मिळणारे पैसे यावर माझं घर चालतंय आणि यासाठी मी बीसीसीआयचा आभारी आहे. मला आता कामाची गरज आहे. मला युवा क्रिकेटपटूंसाठी काम करायचे आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याची माझी इच्छा आहे. मुंबई क्रिकेटने अमोल मुजूमदारला मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम केले आहे. आता मुंबई संघाला जिथे आणि जशी माझी गरज भासेल त्यानुसार मी सेवा पुरवण्यासाठी तयार आहे."
"मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे मदतीसाठी याचना केली होती. मी क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये गेलो होतो पण तो मानद जॉब होता. मला पगाराची म्हणजे पैशाची गरज होती. कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. मी MCA ला अनेकदा सांगितलं की तुम्हाला जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा तुम्ही मला बोलवा. मी सेवा देण्यास तयार आहे. वानखेडे असो किंवा बीकेसी ग्राऊंड असो, मला काम करायला नक्कीच आवडेल. कारण मुंबई क्रिकेटने मला खूप काही दिलंय. त्यामुळे आता माझी परतफेड करण्याची वेळ आहे", असेही विनोद कांबळी म्हणाला.