Vinod Kambli Health Updates : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या त्याच्या प्रकृतीमुळे फार चर्चेत आहे. विनोद कांबळीचा एक व्हिडिओ धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील त्याची अवस्था पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. व्हिडीओत विनोद कांबळीची प्रकृती इतकी बिघडल्याचे दिसत आहे की त्याला त्याच्या दोन पायांवरही उभं राहता येत नव्हतं. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी तर सचिन तेंडुलकर याने विनोद कांबळीची मदत करायला हवं असेही म्हटलं होतं. मात्र आता त्या व्हायरल व्हिडीओबाबत विनोद कांबळीने स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. विनोद कांबळी उभे राहण्यासाठीही धडपडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. काही पावलं चालण्यासाठीसुद्धा त्याला तीन लोकांची मदत घ्यावी लागली. मात्र, आता विनोद कांबळीच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विनोद कांबळीच्या जवळच्या क्रिकेट मित्रांनी व्हायरल झालेला व्हिडिओ जुना आहे आणि सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचे म्हटलं आहे. विनोद कांबळीचे शालेय वर्गमित्र रिकी आणि मार्कस यांनी गुरुवारी त्यांच्या मित्राची भेट घेतली होती.
दोघांनाही विनोद कांबळीने मी ठीक असून सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका, असं सांगितले. "आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा तो खूप आनंदी दिसत होता. त्यांची प्रकृती सुधारत असून ती पूर्वीपेक्षा चांगली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे. त्याच्या पोटावर आता चरबी नाही आणि तो आपले अन्न देखील व्यवस्थित खातो. आम्ही गेलो त्यावेळी त्याचे संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होते आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत होते. त्याचा मुलगा क्रिस्टियानो देखील त्याच्या वडिलांप्रमाणे डावखुरा फलंदाज आहे आणि तो त्याच्या वडिलांकडून फलंदाजीच्या टिप्स घेत आहे," असे मार्कस यांनी हिंदुस्तान टाईम्सची बोलताना सांगितले.
गुरुवारी दुपारी रिकी आणि मार्कस यांनी विनोज कांबळीसोबत सुमारे पाच तास घालवले. यावेळी, कांबळीने वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांच्या धोकादायक बॉडीलाइन गोलंदाजीचा आणि शेन वॉर्नचा सामना करत १९९० च्या दशकातील आपल्या सर्वोत्तम खेळीची आठवण करुन दिली. तिघांनी मिळून जुनी हिंदी गाणीही गायली.
दरम्यान, विनोद कांबळीला यापूर्वीही आरोग्य विषयीच्या भयानक समस्यांचा सामना करावा लागला होता. २०१३ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला लीलावती रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला होता.