Vinod Kambli sings a song Sachin Tendulkar claps : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन बालमित्रांच्या भेटीचा क्षण सध्या चांगलाच चर्चेत आहे. दोघांना घडवणाऱ्या दिवंगत गुरवर्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे नुकतेच मुंबईत अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर त्याच्याकडे जाऊन त्याची विचारपूस करताना दिसला.
विनोद कांबळीचा आणखी एक व्हिडिओ होतोय व्हायरल
कांबळी-तेंडुलकर जोडगोळीच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असताना याच कार्यक्रमातील विनोद कांबळीचा आणखी एक खास व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. यात विनोद कांबळी रमाकांत आचरेकर सरांच्या आठवणींना उजाला देताना त्यांच्या आवडीचं गाणं गाताना पाहायला मिळते.
अडखळत अडखळत गायलं आचरेकर सरांच्या आवडीचं गाणं
कांबळी-तेंडुलकर जोडी अन् आचरेकर सर यांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण यावेळी विनोद कांबळीनं त्यांच्या आवडीचं गाणं कोणतं होतं माहितीये का? असा प्रश्न विचारत थेट गाणं म्हणायला सुरुवात केली. सध्याच्या घडीला विनोद कांबळी अशा आजाराचा सामना करतोय ज्यात त्याला ना नीट चालता येते ना बोलता येते. प्रकृती साथ देईना अन् ओठातून शब्द फुटणं अशा मुश्किल परिस्थितीचा सामना करत असताना विनोद कांबळीनं अडखळत अडखळत आचरेकर सरांच्या आवडीचं गाणं म्हणत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अन् सचिननं वाजवल्या टाळ्या
विनोद कांबळीनं दिवंगत गुरू आचरेकर सरांवर प्रेम व्यक्त करताना गाण्याच्या माध्यमातून ज्या भावना व्यक्त केल्या त्या व्हायरल व्हिडिओ फ्रेममध्ये सचिनचीही झलक पाहायला मिळते. कार्यक्रम आयोजकांनी कांबळीकडे माइक दिल्यावर आचरेकर सरांसोबतच्या आठवणीत भावूक होताना विनोद कांबळीनं 'प्यासा' चित्रपटातील "सर जो तेरा चकराये.." हे गाणं गायले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्याच्या रुपात उपस्थितीत असलेल्या सचिन तेंडुलकरनं कांबळीच्या गाण्यावर टाळ्या वाजवल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येते.
काय होतास तू काय झालास तू...
आचरेकर सरांचा चेला असलेला विनोद कांबळी हा कमालीची क्षमता असणाऱ्या क्रिकेटरपैकी एक होता. डावखुऱ्या हाताने स्फोटक खेळी करण्यात माहिर असणाऱ्या या पठ्ठ्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवातही अगदी धमाक्यात केली होती. पण त्याला क्रिकेटमध्ये आपलं वलय निर्माण करण्यात अपयश आले. क्रिकेट व्यतिरिक्त बाहेरच्या गोष्टीत रमण्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. "काय होतास तू काय झालास तू..." असं म्हणायला लावणाऱ्या अवस्थेत विनोद कांबळी आहे. तो एखाद्या खेळाडूनं यशाचा आलेख उंचावण्यासाठी काय करू नये, याचे उदाहरण होऊन बसलाय.
Web Title: Vinod Kambli sings a song Sachin Tendulkar claps WATCH Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.