मुंबई : सध्याच्या घडीला मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यामधील वाद चांगलाच चर्चेत आहे. या वादावर आता महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनीदेखील भाष्य केले आहे.
महिलांचा ट्वेन्टी-20 विश्वचषक सुरु असताना भारताची माजी कर्णधार मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यामध्ये वाद झाला होता. मिताली फॉर्मात असूनही तिला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. त्यानंतर मिताली आणि रमेश यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता.
याबाबत तावडे म्हणाले की, " एखाद्या निवडणूकीत पराभव झाला की, जरा स्पोर्टींग स्पिरीट दाखवा, असे म्हटले जाते. पण सध्याच्या घडीला क्रीडा क्षेत्रामध्येच राजकारण जास्त पाहायला मिळत आहे. महिला क्रिकेटमधील राजकारणाबाबत मी काही बातम्या वाचल्या. ही समस्या लवकर बीसीसीआयने सोडवायला हवी. "
भारतीय महिला क्रिकेट संघांचे प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मितालीसोबत असलेल्या वादाचा स्वीकार केला. ते म्हणाले, ‘मितालीसोबत आपले तणावपूर्ण संबंध आहेत. तिला सांभाळणे कठीण आहे. ती फार वेगळ्या प्रकारची खेळाडू आहे.’ त्याचवेळी ‘टी२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात मितालीला संघातून वगळणे हा पूर्णपणे सांघिक निर्णय होता, यामागे कोणतेही षड्यंत्र नव्हते,’ असेही पोवार यांनी स्पष्ट केले.
मितालीने मंगळवारी पोवार यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर पोवार बुधवारी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि महाप्रबंधक (क्रिकेट संचालक) साबा करीम यांना भेटले व आपली बाजू मांडली. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘पोवार यांच्या मते मिताली ही एकाकी राहणारी खेळाडू असून तिला आवरणे शक्य होत नाही. तिला उपांत्य फेरीतील सामन्यातून वगळणे हा सांघिक निर्णय होता. तिचा स्ट्राईकरेट कमी असल्यामुळे तिला संघातून वगळण्यात आले होते.
मतभेद दूर करावेहरमनप्रीतने याप्रकरणी अद्याप काही वक्तव्य केलेले नसले तरी उपांत्य सामन्यातून मितालीला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन आधीच केले आहे. मितालीने हरमनसोबतचे मतभेद दूर करण्याची तयारी दाखविली आहे. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की,‘दोन्ही खेळाडूंमधील मतभेद एकत्र बसून दूर केले जाऊ शकतात. दोन्ही खेळाडू देशाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत.’