नवी दिल्ली - भारत-न्यूझीलंडमध्ये बुधवारी दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर टी-20 चा सामना सुरु असताना डगआऊटमध्ये खेळाडूंसोबत बसलेला विराट कोहली हातात वॉकी-टॉकी घेऊऩ बोलत होता. टेलिव्हिजन कॅमे-यांनी हेच दृश्य टिपले. सोशल मीडियावर लगेचच क्रिकेट मॅच सुरु असताना विराट कोहलीची ही कृती वैध कि, अवैध यावरुन चर्चा सुरु झाली. सामना सुरु असताना विराट कोहलीने अशा प्रकारे वॉकी टॉकीवरुन बोलणे नियमाला धरुन आहे का ? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
खरतर विराटने आयसीसीच्या कुठल्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. आयसीसीच्या नियमानुसार ड्रेसिंग रुममध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी आहे. पण खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाच्या सदस्यांना वॉकी-टॉकी वापरण्याची पूर्ण परवानगी आहे. त्यामुळे विराटने कुठेही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. वॉकी-टॉकीवरुन बोलणे पूर्णपणे कायदेशीर आहे.
पंच, सामनाधिकारी आणि खेळाडू वॉकी-टॉकीचा वापर करतात. टी-20 मध्ये डगआऊट ते ड्रेसिंग रुममध्ये वॉकी-टॉकीवरुन संवाद साधतात. कोहलीच्या वॉकी-टॉकी वापरण्यासंबंधी बीसीसीआय किंवा आयसीसी यांनी अद्यापपर्यंत कोणतेही पत्रक प्रसिद्ध केलेले नाही. कोहली या वॉकी-टॉकीवरुन ड्रेसिंगरुममध्ये बसलेल्या भारतीय संघातील सदस्यांशी बोलत होता. फिरोझशह कोटलाच्या दुस-या मजल्यावर ही ड्रेसिंग रुम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिला सामना भारताने 53 धावांनी जिंकला.
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात ५३ धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी केली. याआधी झालेल्या ६ टी-२० सामन्यांत न्यूझीलंडने ५ वेळा बाजी मारली असून एका सामन्याचा निर्णय लागला नव्हता. यासह विराट सेनेने अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला विजयी निरोपही दिला.
येथील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने तुफान हल्ला करताना न्यूझीलंडपुढे विजयासाठी निर्धारित २० षटकांत २०३ धावांचे तगडे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २० षटकांत केवळ ८ बाद १४९ एवढीच मजल मारता आली. पहिल्या षटकापासून दबाव निर्माण करण्यात यश मिळवलेल्या भारतीयांपुढे न्यूझीलंडचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
मार्टिन गुप्टिल (४), कॉलिन मुन्रो (७) स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन (२८) आणि टॉम लॅथम (३९) यांनी काहीसा प्रतिकार केला. हार्दिक पांड्याने विल्यम्सनला बाद केल्यानंतर ठराविक अंतराने न्यूझीलंडचे फलंदाज बाद झाले आणि भारताने दमदार विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंनी प्रत्येकी २ बळी घेतले.