Spin bowling viral video: क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात दररोज नवनवीन गोष्टी घडत असतात. क्रिकेटच्या मैदानात विविध किस्से घडत असतात. काही वेळा असे किस्से घडतात ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात रंगताना दिसते. असाच एक किस्सा सध्या व्हिडीओच्या रुपाने व्हायरल झाला आहे. भल्याभल्या स्पिनर्सना लाजवेल असा स्पिन गोलंदाजीचा नमुना या खेळाडूने दाखवून दिला. म्हणून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कुवेतचा स्पिनर अब्दुलरहमानने एक शानदार ऑफ-स्पिन गोलंदाजी केली. त्यात ऑफ-स्टंपच्या बाहेर टप्पा पडला पण तेथून चेंडू वळला आणि मग थेट लेग-स्टंपवर जाऊन आदळला. टप्पा पडेपर्यंत चेंडू इतका वळेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण घडलेली घटना पाहून केवळ फलंदाजच नव्हे तर मैदानावरील सारे लोक अचंबित झाले. सध्या या चेंडूची प्रचंड चर्चा रंगली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या फिरकीपटूची गोलंदाजीची अँक्शन फारच वेगळी आहे. काही लोकांना ती हरभजन सिंगसारखा वाटते तर काही लोक त्याची तुलना मुथय्या मुरलीधरनशी करतात. भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रानेही या चेंडूवर प्रतिक्रिया व्यक्त करत त्याच्या कॅप्शनमध्ये या चेंडूला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हटले आहे.