Fire in BBL live match, Viral Video: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीग या प्रसिद्ध T20 स्पर्धेत स्टेडियममध्ये आग लागल्याची एक भयानक घटना घडली. ब्रिस्बेन हीट आणि होबार्ट हरिकेन यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान, प्रसिद्ध गाब्बा स्टेडियममध्ये अचानक आगीच्या ज्वाळा उसळल्या. यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला, तर जवळ बसलेल्या प्रेक्षकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. आग वाढण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.
डीजे बूथला लागली आग
गुरुवारी, बिग बॅश लीग सामन्यात होबार्टच्या डावात हा अपघात झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना होबार्टच्या डावातील चौथे षटक सुरू होते. दरम्यान, स्टेडियमच्या एका भागातून अचानक ज्वाळा निघू लागल्या. स्टेडियममध्ये बांधलेल्या डीजे बूथमध्ये ही आग लागली. स्टेडियममध्ये संगीत वाजवण्यासाठी आणि घोषणा देण्यासाठी बांधलेल्या डीजे बूथमध्ये एका छोट्या ठिणगीचे आगीत रुपांतर झाले आणि लगेचच उपस्थित लोकांनी ती विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर करण्यास सुरुवात केली.
या घटनेमुळे सामना तात्काळ थांबवण्यात आला आणि त्या भागात बसलेल्या प्रेक्षकांना तेथून हटवण्यात आले. आग फार मोठी नव्हती पण ती विझवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. काही काळ खेळ थांबवण्यात आला, मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे आगीने रौद्र रुप धारण केले नाही. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या कुणालाही इजा झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. ही आग कशी लागली याबाबत तपास सुरु आहे.
ब्रिस्बेनची दमदार फलंदाजी
या सामन्यात ब्रिस्बेनने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ गडी गमावून २०१ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार उस्मान ख्वाजाने अवघ्या ९ चेंडूत २३ धावा करत वेगवान सुरुवात केली होती. यानंतर मार्नस लाबुशेनने अवघ्या ४४ चेंडूत ७७ धावांची उत्कृष्ट खेळी केली, तर मॅट रेनशॉने झटपट ४० धावा केल्या आणि शेवटी टॉम एस्लॉपने ३९ धावांची खेळी केली. होबार्टकडून नॅथन एलिसने सर्वाधिक ३ बळी घेतले.