-स्वदेश घाणेकरमुंबईतील सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या रोहित शर्माला डावलून इंग्लंडविरूद्धच्या उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी पृथ्वी शॉची निवड होणे, ही रोहित चाहत्यांसाठी धक्कादायक गोष्ट असेल. मात्र क्रिकेट फॉलो करणाऱ्या प्रत्येकाच्या मनातला हा निर्णय आहे. भारतीय संघाच्या सलामीवीरांच्या अपयशावर माजी कसोटीपटू राहुल द्रविडने पृथ्वी शॉचा पर्याय सुचवला होता. तो मान्य करण्यात आला.
( India VS England: भारताने मागवले ‘पृथ्वी’ मिसाईल )
अजूनही २०१३ चा आंतरशालेय क्रिकेट खेळणारा पृथ्वी डोळ्यासमोर आहे. लाजरा, कमी बोलणारा, अधूनमधून सहकाऱ्यांच्या खोड्याही काढणाऱ्या पृथ्वीने वरिष्ठ संघात स्थान पटकावले आणि तेही कसोटीत, याचा सार्थ अभिमान आहे. पाच वर्षांपूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीच्या धक्क्यातून मुंबईकर सावरत असताना आझाद मैदानावर एक नवा सचिन उदयास येत होता. रिझवी स्प्रिंगफील्ड संघाचे प्रतिनिधित्व करताना हॅरीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत 546 धावांची विक्रमी खेळी त्याने केली. प्रणव धनावडेने आंतरशालेय स्पर्धेतील तो विक्रम मोडला.
पृथ्वीने सातत्यपूर्ण खेळी करताना अपेक्षांचे ओझे सक्षमपणे वाहिले. तो दबावासमोर कधीच झुकला नाही. 2016मध्ये मुंबईच्या या खेळाडूची 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड झाली. अभिषेक वर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपदाचा चषक उंचावला. 2018च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पृथ्वीकडे सोपवली. भारताचा माजी कसोटीपटू राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी परिपक्व झाला. त्याची फलंदाजी अधिक बहरली. धावा करण्याची भूक वाढतच राहिली. त्याची बॅटच्या भात्यातून धावांचा पाऊस सुरूच राहिला.
इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे अनुभवी सलामीवीर शरणागती पत्करत असताना भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करणारा पृथ्वी खोऱ्याने धावा केल्या. क्रिकेटच्या प्रेमापायी पृथ्वीने अनेक वर्ष विरार ते मुंबई असा लोकल प्रवास केला. वयाच्या चौथ्या वर्षी आईचे छत्र हरपल्यानंतर वडिलांनीच त्याचा सांभाळ केला. त्यांनी घेतलेल्या कष्टाची जाण राखत पृथ्वी प्रगती करतच राहीला. दृढ निश्चयाच्या जोरावर पृथ्वीने आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान पटकावले आहे. विरार ते टीम इंडिया व्हाया आझाद मैदान, असा पृथ्वीचा प्रेरणादायी प्रवास असाच निरंतर सुरूच रहावा. भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलाय खरा, परंतु केवळ पर्यटक म्हणून तो संघासोबत असू नये, ही अपेक्षा.
पृथ्वी शॉबद्दल जाणून घ्या आणखी
- 2013 मध्ये 14 वर्षीय पृथ्वीने आंतरशालेय स्पर्धेत विश्वविक्रमी खेळी केली. त्याने रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेचे प्रतिनिधित्व करताना 16 वर्षांखालील स्पर्धेत 300 चेंडूंत 546 धावांची विक्रमी खेळी केली आणि तो प्रसिद्धीझोतात आला.
- 2012 व 2013 साली त्याने रिझवीला हॅरीस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले.
- रणजी करडंक स्पर्धेत पदार्पणातच शतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- त्याने 2016-17 च्या रणजी मोसमात उपांत्य फेरीत तामिळनाडूविरूद्ध दुसऱ्या डावात 120 धावा केल्या आणि मुंबईला 6 विकेट राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने आर अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजाचा यशस्वी सामना केला.
- गतवर्षी दुलीप करंडक स्पर्धेत शतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेल्या सर्वात युवा शतकवीराचा विक्रम मोडला. 17 वर्षीय पृथ्वीने भारत रेड संघाचे प्रतिनिधित्व करताना भारत ब्लू संघाविरूद्ध शतकी खेळी केली.
- पृथ्वीने 13 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत 7 शतक आणि 5 अर्धशतक झळकावली आहेत.
- 2012 मध्ये त्याला इंग्लंडच्या चीडल ह्युलम शाळेने त्यांच्या संघाकडून खेळण्याचे निमंत्रण दिले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शतक ठोकले. त्याने दोन महिन्यांच्या स्पर्धेत 1446 धावा केल्या.
- त्या कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंडच्या ज्युलियन वूड क्रिकेट अकादमीने सरावासाठी ऑफर दिली.
- 2018मध्ये त्याने 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व सांभाळले आणि देशाला जेतेपदही पटकावून दिले.
- इंग्लंड दौऱ्यात भारत अ संघाकडून सर्वाधिक 603 धावा त्याच्या नावावर आहेत.
(इंग्लंड दौऱ्यात संघात निवड झाली त्यावेळी लिहिलेला लेख)