नवी दिल्ली - श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघानं सरत्या वर्षाचा शेवट गोड केला. विराट अॅण्ड कंपनीनं 2017 या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये एकूण 53 सामने खेळले असून यापैकी 37 सामन्यात विजय मिळवला तर 12 सामन्यात पराभवाचे तोंड पहावं लागलं. तर एकूण 4 सामन्याचा निकाल लागला नाही. 2017 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णकाळ ठरला आहे. यावर्षी भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 70 ऐवढी आहे. सांघिक खेळाच्या बळावर भारतानं यवर्षी जागतिक क्रिकेटध्ये नवा अध्याय लिहला. वर्षभरात झालेल्या 14 मालिकेमध्ये भारत अजिंक्य राहिला आहे. 2017 वर्ष संपण्यापूर्वी आयसीसीने यंदाच्या वर्षातील अंतिम क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये भारताचा बोलबाला दिसून येत आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीमध्ये विराटसेनेने पहिल्या तीनमध्ये जागा मिळवत वर्षाचा शेवट गोड केला आहे. नवीन वर्षात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये या क्रमवारीत सुधारणा करण्याची भारतीय संघाकडे सुवर्णसंधी आहे.
124 गुणांसह भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर, एकदिवसीय क्रमवारीत 119 गुणांसह दुसऱ्या आणि टी-20 क्रमवारीत 121 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. एकदिवसीय क्रमवारीत आफ्रिकेचा संघ 120 गुणांसह पहिल्या, तर टी-20मध्ये पाकिस्तानचा संघ 124 गुणांसह पहिल्या व न्यूझीलंडचा संघ 123गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात फलंदाजीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचा दबदबा आहे. कसोटीमध्ये विराट 893 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (947गुण) आहे. विराट पाठोपाठ चेतेश्वर पुजारा 873 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली 876 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा 816 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. टी-२०मध्ये विराटचे 776 गुण असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीपुढे ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच (784 गुण) आणि वेस्ट इंडिजचा इव्हीन लेवीस (780 गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे.
कसोटीमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये रविंद्र जाडेजा 870 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन (892 गुण) आणि दक्षिण आफ्रिकेचा कसिगो रबाडा (883 गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट बुमराह 729 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा हसन अली पहिल्या (759 गुण) आणि आफ्रिकेचा इम्रान ताहिर दुसऱ्या (743 गुण) स्थानावर आहे. टी-२०मध्येही बुमराह 702 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर कसोटीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जाडेजा 415 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत बांग्लादेशचा शाकिब अल हसन 438 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.