मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौऱ्यासाठी राष्ट्रीय निवड समिती जेव्हा क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बैठक घेईल. तेव्हा या बैठकीत विराट कोहलीच्या एकदिवसीय प्रारूपातील कर्णधारपद आणि अजिंक्य रहाणेच्या कसोटीतील उपकर्णधारपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच १०० कसोटी सामने खेळलेल्या इशांत शर्माच्या कसोटी संघातील जागेबद्दल आणि अनुभवी फलंदाज शिखर धवन याच्या पुनरागमनाबद्दल चर्चा होईल. तसेच कसोटीत रोहितकडे उपकर्णधारपद देण्याबाबत चर्चा होऊ शकते.
निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा, अभय कुरूविला आणि सुनील जोशी हे मुंबईत आहेत. तसेच याच अठवड्यात बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली, आणि सचिव जय शाह हे देखील काही निर्णय घेतील. त्याचा भारतीय क्रिकेटवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. भारताला दक्षिण आफ्रिकेत तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या खेळात दोन प्रारूपात दोन कर्णधार असण्यापेक्षा एकच कर्णधार असावा, अशी चर्चा आधीच बीसीसीआयमध्ये सुरू झाली आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, विराटने एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून राहणे, सध्या कठीण आहे. कारण या वर्षी खूप कमी सामने आहेत. यामुळे एकदिवसीयला फारसे महत्त्व नाही. मात्र अशात याबाबत निर्णय घेण्यात उशीर होऊ शकतो. दोन प्रारूपात दोन कर्णधार असतील तर वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेकांना वाटते की ही जबाबदारीदेखील रोहितकडेच द्यावी. त्यामुळे २०२३ च्या आधी त्याला संघ तयार करण्यास मदत मिळेल. तसेच रहाणे आणि पुजारा यांचे संघातील स्थान जरी कायम राहिले तरी या प्रारूपात रोहितला उपकर्णधार केले जाऊ शकते.
अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हनुमा विहारी या मधल्या फळीतील फलंदाजांचा फॉर्म पाहता रहाणेला अंतिम ११ मध्ये स्थान मिळणे कठीण आहे.’ बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रहाणे दक्षिण आफ्रिकेला जाईल. मात्र त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळालेच नाही. तर तो उपकर्णधार कसा राहिल. अशात रोहितच पहिली पसंत असेल.’